गुंजीतील माजी सैनिक व समाजसेवक वसंत बांदोडकर यांचे निधन
गुंजी: मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे माजी जवान आणि गुंजी गावचे सुपुत्र कै. वसंत बुधाप्पा बांदोडकर ( सर्वांचे भाई )यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५० वर्षांचे होते.
कै. वसंत बुधाप्पा बांदोडकर यांनी भारतीय सैन्यात १८ वर्षे सेवा बजावली. या काळात त्यांनी आसाम, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरसारख्या अतिसंवेदनशील भागांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांनी आपल्या गावाला आणि परिसराला मदत करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. गावातील अनेक देवस्थानांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. रावळकट्टा बाबा देवस्थानच्या जीर्णोद्धार यात्रेत आणि इतर मंदिरांच्या विकासकार्यात त्यांनी सक्रिय भूमिका घेतली.
काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. मात्र, शारीरिक मर्यादा असूनही त्यांनी गावामध्ये काठीच्या आधारे फिरून लोकांशी संपर्क ठेवला आणि समाजसेवा सुरू ठेवली.

त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गुंजी गावात आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ७:०० वाजता गुंजी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, या शोकाकुल वातावरणात गावकऱ्यांकडून प्रार्थना केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी, सून, जावई असा परिवार आहे.