क्राईम
डंपर दरीत कोसळला; बेळगावचा चालक ठार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वातुल(राजापूर)जवळ वाळूने भरलेला डंपर उलटून झालेल्या अपघातात डंपरचालक विष्णू शिवप्पा पामर (वय 28, रा. बेळगाव) जागीच ठार झाला. बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर डंपरच्या केबिनला आग लागली आणि हा डंपरही जळून खाक झाला.
राजापूरमधील ओणी येथून विलावडे गावाकडे वाळू नेत असताना वातूळ येथील एका धारदार वळणावर डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाळूने भरलेला डंपर जवळच असलेल्या 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, डंपर चालकाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. खालचा भाग डंपरमध्ये अडकला होता तर धड वेगळे होऊन बाहेर फेकले गेले होते.
