मराठी भाषिकांचा सकारात्मक प्रतिसाद: निरंजन सरदेसाई
खानापूर: कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निरंजन सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खानापूर या समितीच्या बालेकिल्ल्यात अजूनही मराठी भाषिकांमध्ये सीमाप्रश्नाची तळमळ आहे. या निवडणुकीत मराठी भाषिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास समितीला उभारी मिळणार आहे. परिणामी, पुढील सर्व निवडणुकांमध्ये समितीला बळ मिळेल. त्यामुळे ती लोकसभेच्या निवडणुकीत मतांमध्ये रुपांतरित होईल, असा विश्वास उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी व्यक्त केला.
प्रश्न: कारवार लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढविण्याचा निर्णय का घेतला?
सरदेसाई : गेल्या काही वर्षांमध्ये समितीची होत चाललेली पिछेहाट पाहून तसेच आगामी काळात मराठी भाषा व संस्कृती टिकविण्याचे आव्हान निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. कारवार व हल्ल्याळमध्ये मराठी भाषा व संस्कृतीची जी गत झाली आहे, त्याची पुनरावृत्ती होऊ नये हा उद्देशही आहे. मराठी भाषा टिकविणे आणि सीमाप्रश्न सोडविणे हेच उद्दिष्ट महाराष्ट्र एकीकरण समितीने निश्चित केले आहे. निवडणुकीच्या माध्यमातून हा लढा जिवंत ठेवला जाणार आहे. तसेच पुन्हा एकदा जागृती निर्माण करण्यात येणार आहे.
प्रश्न: सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत तुमची पुढची रणनीती काय?
सरदेसाई : सीमाप्रश्नाचा दावा हा गेली वीस वर्षे प्रलंबित आहे. त्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासन व वकिलांशी चर्चा करणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सीमाप्रश्नाचा सखोल अभ्यास करून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काय करता येईल, याचे अभ्यासपूर्ण नियोजन केले जाणार आहे. येत्या काळात न्यायालयीन लढ्याचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल.
प्रश्न: तरुण पिढी महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये सक्रिय व्हावी, यासाठी काय करणार?
सरदेसाई: सीमाभागातील मराठी भाषिकांची चौथी पिढी सीमालढ्यात सक्रिय आहे. मी स्वतः तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये मराठी तरुण राष्ट्रीय पक्षांकडे वळले आहेत. सीमालढ्यातील मराठी तरुणांचा सहभाग कमी व्हावा यासाठी अन्य मुद्दे पुढे आणले जात आहेत. या प्रयत्नात राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. तरुणांनी सीमालढा सोडून दिलेला नाही, पण त्यांना संघटित करून हा लढा पुढे नेण्याची गरज आहे. आगामी काळात प्रत्येक गावात महाराष्ट्र एकीकरण समितीची शाखा सुरू करण्याचा प्रयत्न असेल. युवकांना संघटित करून त्यांना पदे देण्यासह संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
■ प्रश्न आपल्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र एकीकरण समितीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आलेत का?
सरदेसाई : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मला उमेदवारी मिळाल्यामुळे मतभेद चव्हाट्यावर आलेले नाहीत, पण समितीमध्ये राहून ज्यांनी अन्य राजकीय पक्षांसोबतचे आपले लागेबांधे ठेवले आहेत, त्यांची मात्र अडचण झाली आहे. सीमालढ्यात सक्रिय असलेले अनेकजण या निवडणुकीपासून दूर राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण झाली आहे एवढेच. लोकसभा निवडणूक हा आता महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची गरज आहे.
■ प्रश्न आपला प्रचार खानापूर विधानसभा मतदारसंघापुरताच मर्यादित आहे, असे वाटत नाही का ?
सरदेसाई : माझा प्रचार खानापूर तालुक्यापुरता मर्यादित नाही. मात्र, कारवार लोकसभा मतदारसंघातील सर्व मराठी भाषिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. जोयडा, हल्याळ तालुक्यामध्येही मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे तेथेही आमचा प्रचार सुरू आहे. खानापूर हा मराठीबहुल मतदारसंघ आहे. येथे 84 टक्क्यांपेक्षा जास्त मराठी भाषिक आहेत. त्यामुळे अर्थातच खानापूर तालुक्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
■ प्रश्न : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समितीला बळ मिळेल का ?
सरदेसाई लोकसभा निवडणुकीमध्ये समितीला म्हणजे मला मागच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळतील, याची खात्री आहे. विधानसभा निवडणुकीत जी चूक झाली, ती चूक सुधारण्यात आल्याचा संदेश या माध्यमातून खानापूर मतदारसंघातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलो आहोत, निवडणुकीनंतरही त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला जाईल. मराठी भाषिकांना संघटित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल.
■ प्रचारात खानापूर तालुक्यातून कसा प्रतिसाद मिळाला ?
सरदेसाई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावात जाता आले, त्या प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुम्ही लढा सुरू ठेवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही मराठी भाषिकांनी दिली. मराठी तरुण सीमालढ्यात सक्रिय होऊ इच्छितात हे प्रचारावेळी दिसून आले. कणकुंबी, पारवाड, जांबोटी, गलगुंजी, शिरोली, नेरसा, चापगाव आदी गावांमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ज्येष्ठ व तरुणांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे सीमालढ्याला व महाराष्ट्र एकीकरण समितीलाही बळ मिळाले असून, ही भविष्यातील विजयाची नांदी आहे.