खानापूर

सीमाभागातील पुणेस्थित उद्योजक मारुती ईराप्पा वाणी यांना कैलास मानसरोवरचा प्रथम पूजेचा मान

  • भारतीय टीमचे केले नेतृत्व
  • भारत चीन वादामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कैलास मानसरोवर दर्शनाची झाली सुरुवात
  • सीमाभागातील बेळगाव खानापूरसह पुणेकरांनी दिल्या शुभेच्छा
  • सामाजिक बांधिलकी आणि विश्वशांतीसाठी अनेक वर्षांचा केलेला संकल्प पूर्णत्वास आल्याने वाणी कुटुंब झाले समाधानी.

मानसरोवर ही महापवित्र आणि सर्वात मोठी व अवघड समजली जाणारी यात्रा असून या ठिकाणी जाण्याचा योग ज्याला आला तो या भूतलावरील सर्वात पुण्यवान समजला जातो. मानसरोवर हा चीनमधील एक स्वायत्त प्रदेश असून तिबेट मध्ये त्याचा समावेश होतो.कैलास पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या या अंडाकृती प्रदेशाची उंची सुमारे चार हजार पाचशे मीटर म्हणजेच 14,764 असून त्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे.येथे हिंदूंचे दैवत भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे निवासस्थान असल्याचे मानले जाते, बौद्धांचे महान आनंद आणि अमरत्व यांचे प्रतिक, जैन धर्मीयांचे पहिले जैन तीर्थकार यांचे निर्वाण स्थान व शीख समुदायांचे अमृत सरोवर म्हणूनही याला ओळखले जाते त्यामुळे कैलास मानसरोवर जगप्रसिद्ध यात्रा ही हिंदू बौद्ध जैन आणि शीख समुदांसाठी अत्यंत पवित्र धार्मिक यात्रा मानली जाते. या सरोवराचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असून सभोवतालचा परिसर रमणीय आहे.सिंधू ,ब्रह्मपुत्रा सतलज , कर्णाली अशा अनेक पवित्र नद्यांचा हा संगम आहे.

मानसरोवराला भेट देण्यासाठी चीन सरकारचा परवाना लागतो हा प्रवास भारतातून करायचे असल्यास कट जर्नी स्वरूपात विमान व हेलिकॉप्टर असा नऊ दिवसाचा व नेपाळची राजधानी काठमांडू येथून जायचे असल्यास वाहनाद्वारे रस्त्याने 14 दिवस लागतात. या पवित्र स्थानाची उंची एव्हरेस्ट पेक्षाही जास्त असून हा भाग आजतागायत एकाही गिर्यारोहकाला सर करता आलेला नाही.हा नोफ्लाय झोन असून या पर्वत शिखरावरून विमान उड्डाण करण्यास प्रतिबंध आहे.स्वर्गाचे द्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी कैलास मानसरोवरामध्ये देव देवता स्नान करून पूजा पाठ करतात अशी भाविकांची श्रद्धा असून जवळच गौरीकुंड, राक्षस तलाव,यमद्वार असे अनेक भाग पुराणाची साक्ष देतात.


या यात्रेत कैलासपर्वताच्या कुशीत राहून परिक्रमा करण्याचा एक अद्भूत अनुभव उद्दोजक मारुती वाणी यांना मिळाला असून त्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागला.पायी यात्रा किंवा घोड्यावरून हा प्रवास करता येतो.बारा ज्योतिर्लिंगची महापुण्ययात्रा या एकाच ठिकाणी फलद्रुप होते.येथे सातत्याने हिमवृष्टी होत असल्याने ठराविक कालावधीतच येथे दर्शन घेण्याची सुविधा असते.
येथील सकाळचे सूर्योदय दर्शन म्हणजेच मनी कैलास दर्शन विलोभनीय असून या कैलास पर्वताच्या सभोवताली अनेक रहस्ये आहेत.मानसरोवरभोवती अनेक हंसही दिसतात. “विश्वाचे केंद्र” म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील दुवा असल्याचे म्हटले जाते. नासानेही भगवान शिवाच्या हसऱ्या चेहऱ्याची प्रतिबिंबित करणारी प्रतिमा उपग्रहाद्वारे टिपल्याचे सांगितले जाते.
सतीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या या सरोवराच्या निर्मितीपूर्वी ब्रम्हदेवाने सरोवराचे पहिले त्यांच्या मनात दर्शन घडवले त्यानंतर पृथ्वीवर साकार झाल्याचे सांगण्यात येते. येथील आश्चर्य म्हणजे सरोवरात फुललेली कमळेही कैलास पर्वताच्या दिशेने तोंड करतात तर सरोवराचे पवित्र पाणी पिल्याने भगवान शिवाच्या आशीर्वादाने केलेल्या पापांची क्षमा होते असे म्हटले जाते. येथे केलेल्या “ओम नमः शिवाय “या मंत्र जपाने जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तत्त्वज्ञान,धर्म आणि सभ्यता यांची शिकवण देणारे हे आध्यात्मिक केंद्र आहे.

महाकाय हिमालयाच्या मध्यभागी असलेला हा पवित्र पर्वत युगानयुगे काळाच्या ओघात टिकून राहिला कारण भगवान शिवाचे स्वर्गीय निवासस्थान आहे म्हणूनच त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रा ही केवळ एक अध्यात्मिक यात्रा नसून ती शिवाच्या आशीर्वादासाठी लाखो शिव भक्तांचे आसुसलेले एक स्वप्न आहे.
एक प्रतिथयश उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलेले सीमाभागातील मेंढेगाळी गावचे सुपुत्र पुणेस्थित उद्दोजक सन्माननीय मारुती ईराप्पा वाणी यांनी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कैलास मानसरोवर दर्शनासाठी पाहिलेले जे स्वप्न होते ते आज सत्यात उतरले असून त्यांचा जीवन प्रवास उलगडल्यास त्यांनी आजतागायत अशा अनेक आध्यात्मिक आणि तीर्थयात्रा पूर्ण केल्या आहेत त्यात गंगोत्री,यमुनोत्री,अमरनाथ,केदारनाथ
काशी यात्रा,द्वारकानाथ,बद्रीनाथ जगन्नाथ,रामेश्वर या चारोधाम यात्रा, बारा ज्योतिर्लिंग, पशुपतीनाथ, अय्यप्पा स्वामी दर्शन यांचा समावेश आहे.यातील बहुतांश तीर्थयात्रा मातृदेवोभवो प्रमाणे आपल्या आई सावित्रीसमवेत व लहानपणी पितृछत्र हरपल्याने पितृतुल्य ज्येष्ठ बंधु यांच्या समवेत पूर्ण केल्या आहेत. भक्तिभावाने त्यांनी अनेकदा अठरा किलोमीटरचा पायी प्रवास करत तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आहे. एवढेच काय गिरनार परिक्रमाचे छत्तीस किलोमीटरचे अवघड वाटेचे अंतर अनेकदा पादांक्रांत केलेले आहे.
गेल्याच वर्षी पुणे येथील बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन व खानापूर बेळगाव मित्र मंडळ पुणेचे उत्साही आणि अध्यात्मिक वारसा जपणारे उद्योजक यांना गिरनार परिक्रमाचे दर्शन घडवण्यासाठी त्यांनी नेतृत्व केले. नाशिक, हरिद्वार व गेल्या वर्षी 144 वर्षांनी प्रयागराज येथे भरलेल्या ऐतिहासिक कुंभमेळ्याचा लाभ अनेक ज्येष्ठांना देण्यासाठी त्यांनी यशस्वी नियोजन केले.

आज खानापूर,बेळगाव सीमाभागात जन्मलेल्या उमद्या व्यक्तिमत्त्वांनी पुणेरी उद्योगविश्वात यशस्वी घोडदौड करुन शेकडो बेरोजगारांच्या हाताला काम तर दिलेच पण त्यांच्या सुखी संसारासाठी आणि सामाजिक बांधिलकी राखण्यासाठी अध्यात्मिक वारसा जपण्याचा मार्गही दाखविला. ग्रामीण सीमाभागातील अनेक मंदिरांच्या उभारणीसाठी त्यांनी भरघोस आर्थिक मदत करून संस्कृती संवर्धन करण्यात तसेच ग्रामीण भागात मूलभूत सुविधा निर्माण करण्यात व शैक्षणिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे .वृद्ध, निराधार, अनाथ यांच्या सेवेसाठी आपला वेळ व आर्थिक मदत केली असून ज्येष्ठांना अन्नछत्र व तीर्थयात्रांचा लाभ मिळवून दिला आहे . बेळगाव सीमा भागातील अनेक सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली असून कैलास मानसरोवर यात्रेनिमित्त समाजातील नव्या पिढीने भारताचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जोपासण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी लवकरच एक अध्यात्मिक व्यासपीठ उभे करण्याचा त्यांचा मानस आहे.अशा या ध्येयवेड्या,श्रद्धाळू उद्योगरत्नाला सर्व सीमावासीयांकडून तसेच पुणेकर मित्रमंडळीकडून खूप खूप शुभेच्छा.

प्रतिनिधी: श्री पांडुरंग काकतकर , सिंधुदुर्ग

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या