इदलहोंड: विवाहित महिलेचा पाठलाग, नंतर थेट हल्ला; भावाच्या डोळ्यात मिरची पूड
खानापूर: तालुक्यातील इदलहोंड गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तीने अखेर तिच्यावर आणि तिच्या पतीवर वीटभट्टीवर काम करत असताना हल्ला चढवला. हल्ल्यादरम्यान महिलेच्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला गंभीर दुखापत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काजल मल्लप्पा पुजारी (मूळ रचाकट्टी, हुक्केरी) ही विवाहित महिला काही काळापासून इदलहोंड येथील वीटभट्टीवर आपल्या पतीसोबत मजुरी करते. तिच्याच गावातील लगमप्पा नावाच्या विवाहित व्यक्तीने तिला मागील महिनाभरापासून मानसिक त्रास दिला. “पतीला सोड, कितीही पैसे देतो” अशा स्वरूपाचे अश्लील प्रस्ताव देत तो सतत तिचा पाठलाग करत होता.
शनिवारी दुपारी, काजल आणि तिचा पती मल्लप्पा पुजारी कामावर असताना, लगमप्पा आपल्या सात सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला आणि अचानक हल्ला केला. हल्लेखोरांमध्ये मल्लप्पा पुजारी, मल्लेश पुजारी, लगमेश पुजारी, सिद्दव्वा पुजारी, कारेव्वा पुजारी, लक्कव्वा पुजारी आणि आणखी एक सिद्दव्वा पुजारी यांचा समावेश आहे.
हल्ल्यादरम्यान काजलचा भाऊ प्रसंगात मदतीला धावला असता, त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली, ज्यामुळे त्याला डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.