खानापूर: हत्तीच्या दातांची विक्री, तिघांना अटक
खानापूर : नेरसा परिसरात वन्यजीवांची शिकार व तस्करी प्रकरणात 9 जणांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच, खानापूर तालुक्यातील घस्टोळी क्रॉसजवळ आणखी एक घटना समोर आली आहे. घस्टोळी क्रॉसजवळ हस्तिदंत(हत्तीचे दात) विक्रीसाठी आलेल्या तिघा संशयितांना जिल्हा सीईएन पथकाने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून हस्तिदंताचे सात तुकडे जप्त करण्यात आले आहेत.

बुधवारी ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आणि CENचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, उपनिरीक्षक आनंद, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टी. के. कोळची, ए. एच. बजंत्री, जयराम, एन. आर. गड्याप्पन्नावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही धडक कारवाई केली.
अटक करण्यात आलेले संशयित पुढीलप्रमाणे:
- संजय शामराव गवाळकर, रा. सीतावाडा-रामनगर, ता. जोयडा
- जाफर बाबू गुंडोळ्ळी, रा. भुरुणकी, ता. खानापूर
- बसवराज ऊर्फ अभिषेक रवी वड्डर, रा. भुरुणकी, ता. खानापूर
या तिघांना ताब्यात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस आणि वनखाते सतर्क झाले आहेत. हस्तिदंताच्या तुकड्यांची विक्री करण्यासाठी ही टोळी घस्टोळी क्रॉसजवळ आली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली.
या घटनेमुळे खानापूर तालुक्यात वन्यजीव शिकार आणि तस्करीचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब पुन्हा समोर आली आहे. स्थानिक प्रशासन आणि वनविभाग यांना या प्रकरणाची अधिक चौकशी करून कठोर कारवाई करावी लागणार आहे.