पगारासाठी वयोमर्यादा 60 असतानाही लाभार्थी 40 वर्षांचे! तहसीलदार, पीडीओंवर गुन्हा दाखल
गोकाक – संध्या सुरक्षा योजनेत 59 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याच्या संशयावरून लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी पहाटे गोकाक तहसील कार्यालयावर छापा टाकला. या कारवाईत ग्रेड टू तहसीलदार श्रीकांत बेटगेरी, महसूल अधिकारी सागर कट्टीमणी यांच्यासह 9 पीडीओंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यामुळे तहसील प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
अर्जदारांच्या वयोमर्यादेत फेरफार?
लोकायुक्त पोलिसांच्या माहितीनुसार, संध्या सुरक्षा योजनेसाठी किमान वयोमर्यादा 60 वर्षे असतानाही 40 वर्षे वयोगटातील काहींना लाभ देण्यात आला. बसवाणी तिगडी या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त पोलिसांनी तपास सुरू केला. छाप्यादरम्यान कागदपत्रे आणि संगणक नोंदींची तपासणी करण्यात आली.
कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई?
या गैरव्यवहार प्रकरणी ग्रेड टू तहसीलदार श्रीकांत बेटगेरी, महसूल अधिकारी सागर कट्टीमणी यांच्यासह 9 पीडीओंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या पंधरवड्यात खानापूरमध्येही कारवाई
गेल्या पंधरा दिवसांत लोकायुक्त पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. याआधी खानापूर तहसील कार्यालयात गैरव्यवहार आढळून आल्यानंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निलंबित करण्यात आले होते.
गोकाक तहसील कार्यालयातील या भ्रष्टाचार प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, पुढील तपास लोकायुक्त जिल्हा पोलिसप्रमुख एल. हनुमंतय्या यांच्या नेतृत्वाखाली केला जात आहे.

