चन्नमा एक्सप्रेसला अतिरिक्त जनरल डबा,प्रवाशांची सोय
खानापूर : सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डब्बा जोडण्यात आला आहे. त्यामुळे पासधारक प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. जनरल तिकिटांचा कोटाही यामुळे वाढला आहे.
सांगली रेल्वे स्टेशनवरून उगार, चिंचली, रायबाग, चिकोडी रोड, घटप्रभा, गोकाक रोड, पाचापूर, बेळगाव, खानापूर, लोंढा, अलनावर, धारवाड, हुबळी, दावणगिरी, आर्सिकेरी, तुमकूरु, बेंगलोर आदी ठिकाणी जाणाऱ्या जनरल तिकीट व मासिक पास घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे.

सांगली-बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस व बेंगलोर-सांगली राणी चेनम्मा एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना रेल्वेने एक अतिरिक्त जनरल डब्बा जोडला आहे.
त्यामुळे जनरल तिकीट व मासिक पास घेऊन दावणगिरीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष सोय झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, महिला तसेच रुग्णांना या एक्सप्रेसच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करता येईल.
अतिरिक्त जनरल डब्यामुळे बसून प्रवास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोणालाही उभे राहून प्रवास करावा लागणार नाही. पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बेळगाव तसेच धारवाड जिल्ह्यात जाणाऱ्या जास्तीत जास्त प्रवाशांनी सांगली स्थानकावरुन प्रवास करावा.
