खानापूर
सागरे गावात अल्पवयीन मुलीला धमकावून दरोड्याचा प्रयत्न
खानापूर: तालुक्यातील सागरे गावात दिनांक 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता एक धक्कादायक घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला धमकावून घरात चोरीचा प्रयत्न केला.
प्राप्त माहितीनुसार, मुलगी घराबाहेर असताना अज्ञात व्यक्तीने तिच्यावर झडप घातली. त्याने तिचे नाक, तोंड आणि डोळे झाकून तिला घराच्या बाजूला नेले आणि धमकी दिली की, “कोणालाही सांगितले तर चाकूने मारीन.”
यानंतर आरोपीने घराची चावी आणि दागिन्यांबद्दल विचारणा केली. सुमारे अर्धा तास तो तिला तिथेच रोखून धरत होता. मात्र, काही वेळाने गाडीचा आवाज आल्याने आरोपी पळून गेला. जाताना त्याने पुन्हा धमकी दिली की “ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तुला ठार मारीन.”
ही घटना समोर आल्यानंतर गावात भितीचे वातावरण पसरले आहे. मुलीला मानसिक धक्का बसला असून कुटुंबीयांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.