संस्कार, स्वावलंबन आणि एकतेचा संदेश देणारा हळदी-कुंकू सोहळा
आक्राळी (ता. खानापूर): केसरी समर्थ युवा व महिला संघ, मोहीशेत आणि श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब, आक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आक्राळी येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावप्रमुख श्री कोमा मिराशी होते.

प्रमुख पाहुणे म्हणून सौ. उज्वला गावडे (बेळगाव), सौ. एलीना बोर्जिस (खानापूर), श्री एल. डी. पाटील (गर्लगुंजी, माजी मुख्याध्यापक), तसेच समाजसुधारक श्री खेमराज गडकरी (घोटगाळी), श्री गोविंद पाटील (तोराळी), श्री विनोद कुराडे (पुणे) आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सर श्री एल. डी. पाटील यांनी संस्कृत श्लोक मंत्रोच्चारासह स्वागत गीत सादर केले. संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण जयवंत खांडेकर यांनी प्रास्ताविक करत संघाचा हा आठवा हळदी-कुंकू कार्यक्रम असल्याचे सांगितले. त्यांनी महिलांना सक्षम बनवणे, संस्कार व संस्कृतीचे जतन, स्वावलंबन, दारिद्र्यातून श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
सौ. उज्वला गावडे यांनी हळदी-कुंकूचे धार्मिक महत्त्व सांगितले, तर सौ. एलीना बोर्जिस यांनी आपले मनोगत काव्यातून व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
विनोद कुराडे यांनी उपस्थित पालकांना आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कसे मार्गदर्शन करावे यावर विचारमंथन केले. महिलांना पंचाअन्न देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण जयवंत खांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघाचे उपाध्यक्ष महेश गावडे यांनी केले.
