खानापुरमध्ये आज भव्य तिरंगा रॅली; आमदार विठ्ठल हलगेकर यांचे जनतेला आवाहन
तिरंगा यात्रेचा उत्सव: खानापूर शहर सज्ज, देशभक्तांची एकत्रित रॅली
खानापूर – भारतीय सैनिकांच्या शौर्याचा गौरव आणि राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी देशभरात “तिरंगा यात्रा” उत्साहात सुरू आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर, भारतीय जवानांनी पाकिस्तानविरुद्ध दिलेल्या शौर्यपूर्ण लढ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण भारतात या यात्रेचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर शहरात आज शुक्रवार, 23 मे 2025 रोजी भव्य तिरंगा यात्रा होणार आहे.
या तिरंगा यात्रेला सकाळी 10:30 वाजता बसवेश्वर सर्कल, खानापूर येथून सुरुवात होईल. ही रॅली शिवस्मारक, स्टेशन रोड, ज्ञानेश्वर मंदिर, बाजारपेठ, चौराशी मंदिर मार्गे पुढे जाईल. या यात्रेद्वारे देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान जागवण्याचा उद्देश आहे.
“हर घर तिरंगा” सारख्या मोहिमांमुळे राष्ट्रध्वज हा केवळ झेंडा न राहता, तो एक लोकचळवळ, प्रेरणा आणि अभिमानाची भावना बनला आहे. या यात्रेद्वारे आपण देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांना आदरांजली वाहत आहोत.
यात्रेचे आयोजकांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून, आपण एक जागरूक भारतीय नागरिक म्हणून या यात्रेत सहभाग घ्यावा. खानापूर तालुक्यातील सर्व देशभक्त, आजी-माजी सैनिक, संत वारकरी मंडळी, महिला भगिनी, विविध संघटना, तरुण वर्ग यांनी सकाळी साडेदहा वाजता या तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या रॅलीसाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सर्व नागरिकांना, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, पंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
“ही रॅली देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ आहे,” असे आमदार हलगेकर यांनी सांगितले. “ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेले आमचे जवान, विशेषतः तालुक्यातील जवान या रॅलीत उपस्थित राहून देशाचा अभिमान वाढवतील अशी अपेक्षा आहे,” असेही ते म्हणाले.
आजी-माजी सैनिकांसह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. “फक्त एका तासासाठी का होईना, पण देशसेवेचा आदर्श दाखवण्याची ही संधी आहे,” असे आमदार हलगेकर म्हणाले.
एकच नारा – भारत माता की जय!
एकच झेंडा – तिरंगा झेंडा!