जिद्द आणि चिकाटीने यशाची शिखरे सर करा – पत्रकार वासुदेव चौगुले यांचा सल्ला
तोपिनकट्टी, ता. खानापूर – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीला न घाबरता जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशाची शिखरे सर करावीत, असा प्रेरणादायी सल्ला पत्रकार वासुदेव चौगुले यांनी दिला. ते तोपिनकट्टी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा सोहळा व नूतन एसडीएमसी सदस्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसीचे अध्यक्ष हुवाप्पा गुरव होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका हेलन परेरा, पत्रकार प्रल्हाद मादार, पिराजी पाखरे यांची उपस्थिती होती.

वासुदेव चौगुले म्हणाले, “आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षण घ्या. संकटांना घाबरू नका, तर त्यांचा सामना करत यश मिळवा. शेतकरी घरात जन्म घेणे ही शरमेची गोष्ट नाही, तर अभिमानाची बाब आहे.”
मुख्याध्यापिका हेलन परेरा यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, “मातृभाषेतून मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या समज, आकलन आणि बौद्धिक क्षमतेला अधिक बळकट करते. पालकांनी मुलांना मातृभाषेतील शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
या कार्यक्रमात वर्षभर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नूतन एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सरस्वती गुरव, हणमंत खांबले, मल्लेशी तीरवीर, जोतिबा होसुरकर, जोतिबा बेकवाडकर, संतोष करंबळकर, परशराम गुरव, सोनाली पाटील, पूजा गुरव, मनीषा बांदिवडेकर, गीता हलगेकर, मलप्रभा सुतार, भीमसेन करंबळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिराजी पाखरे यांनी केले.