मेंडील ग्रामस्थांचा हेस्कॉम कार्यालयावर संतापमोर्चा
खानापूरवार्ता: मेंडील गावात गेल्या आठ महिन्यांपासून सोलर विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने गावकरी अंधारात जीवन जगत आहेत. वीजपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. आधुनिक युगातही गाव वीजविहीन राहणे ही गंभीर बाब असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

गेल्या 15-16 दिवसांपूर्वी हेस्कॉम कार्यालयाला सविस्तर निवेदन दिले होते, परंतु त्या समस्येचे निराकरण करण्यास हेस्कॉम खाते पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी व समाजसेवकानी आज खानापूर हेस्कॉम कार्यालयावर पुन्हा जाब विचारत आंदोलन केले.
वीज नसल्यामुळे रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांच्या हालचालींमुळे घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे. नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने आता कठोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शिरोली ग्रामपंचायत सदस्य दीपक गवाळकर, समाजसेवक विजय मादार, नामदेव पाटील, पांडुरंग पाटील, संतोष गुरव, शाबा मळीक, जयराम पाटील आणि मेंडील गावकरी उपस्थित होते.

