गुंजी ग्रामपंचायतीकडून आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडे मूलभूत सुविधांसाठी मागण्या

बेळगाव: खानापूर तालुक्यातील गुंजी गावातील विविध मूलभूत समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेचे सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची भेट घेऊन अधिकृत निवेदनाद्वारे मागण्या सादर केल्या.
गुंजी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ. स्वाती गुरव आणि ग्रामपंचायत सदस्यांनी चिक्क हट्टीहोळी येथील आमदार हट्टीहोळी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या गावी होत असलेल्या अडचणींविषयी चर्चा केली.

या वेळी शिष्टमंडळाने खालील प्रमुख मागण्या मांडल्या:
- LVUP (लाईट व्हेईकल अंडरपास) – बेळगाव-गोवा महामार्गावरील गुंजी बायपासच्या पूर्वेला असलेल्या जुन्या विहिरीचे पाणी गावात आणण्यासाठी अंडरपास सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- दैविवन प्रोजेक्ट – श्री माऊली मंदिराच्या परिसरात दैविवन प्रकल्प राबवण्यात यावा.
- प्राथमिक आरोग्य केंद्र – गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी.
- शाळा व रस्ते सुधारणा – मराठी शाळेचा विकास करावा व गुंजी ते गुंजी रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करावे.
या भेटीप्रसंगी ग्रामीण काँग्रेस नेते एस. एम. बेळवटकर, ग्रामपंचायत सदस्य हणमंत जोशीलकर, वनिता देऊळकर, अन्नपूर्णा मादार, तसेच गावकरी लक्ष्मण मादार व वासुदेव देऊळकर उपस्थित होते.
गुंजी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ. स्वाती गुरव व इतर सदस्यांनी या मागण्या महिला व बालकल्याण मंत्री यांच्याकडेही लेखी स्वरूपात मांडल्या असून, या मागण्यांकडे सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.