लक्केबैल सचिव आत्महत्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल; सहा अटकेत, एक फरार

खानापूर: लक्केबैल येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरनाला आता वेगळे आले आहे. त्यांची पत्नी लक्ष्मी पाटील यांच्या तक्रारीनुसार, सोसायटीच्या काही आजी-माजी संचालकांसह गावातील सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरारी असल्याचं समजतंय.
प्रकाश पाटील यांनी मंगळवारी सोसायटीच्या सभागृहात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. तातडीने त्यांना बेळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचाराअभावी बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मी पाटील यांच्या तक्रारीनुसार, काही आजी-माजी संचालक आणि गावातील काही लोकांकडून मिळालेल्या धमक्या आणि आर्थिक व्यवहारांच्या ताणामुळेच प्रकाश पाटील यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पाटील यांच्याकडून काही व्यक्तींनी दहा लाख रुपये घेतले होते, मात्र ते परत देण्यास टाळाटाळ केल्याने मानसिक तणावात येऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येच्या ठिकाणी एक चिठ्ठी ठेवली असल्याची माहिती मिळाली असून त्याच आधारे आणि त्यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.
बुधवारी रात्री उशिरा एफआयआर नोंदवण्यात आली, त्यानंतर गुरुवारी दुपारी पाटील यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

