खानापूर: रिया पाटील यांना नृत्य आणि अभिनय क्षेत्रात ‘भारत कला भूषण’ पुरस्कार
खानापूर: तालुक्यातील भांबर्डा येथील रिया रामानिंग पाटील सध्या राहणार मच्छे यांनी नृत्य आणि अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी 25 जानेवारी 2025 रोजी बेळगांव येथे झालेल्या राष्ट्रीय कला संस्कृती संमेलनात त्यांना ‘भारत कला भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यामुळे खानापूर तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.

रिया पाटील एक कुशल नृत्यांगना आणि अभिनेत्री असून त्यांनी वेबसीरिज, मराठी व कन्नड चित्रपट, आयटम साँग्स आणि शॉर्ट फिल्म्समध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. ‘प्रेमाचा पाऊस’ या मराठी चित्रपटातील मुख्य नायिका, कन्नड चित्रपट ‘शैकी’मधील प्रमुख भूमिका आणि ‘घुंगरू’ चित्रपटातील आयटम साँगने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली आहे.

‘जुगलबंदी’ या वेबसीरिजमध्ये त्यांनी मुख्य पात्र साकारली असून, ‘Quick Prime 25 Marathi’ या यूट्यूब चॅनलवर त्यांचे एपिसोड्स पाहता येतात. ‘जय भीम’ या मराठी चित्रपटातील आयटम साँगसाठी त्यांची निवड झाली आहे, आणि शूटिंग फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.
त्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा मध्ये अनेक मोठ्या शोजमध्ये भाग घेतला आहे. ‘गर्ल फ्रेंड नसताना’ या कव्हर अल्बम साँगमध्ये आणि ‘रक्षाबंधन’ शॉर्ट फिल्ममध्ये त्यांचा सहभाग आहे.
त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना ‘भारत कला भूषण’ पुरस्कार प्राप्त झाला, आणि त्यांच्या कामामुळे खानापूर तालुका अभिमानित झाला आहे.

