खड्डे बुजवा, जनतेचा संयम संपत चाललाय! रस्त्यांचा प्रश्न अधिकच गंभीर
जांबोटी-खानापूर, रुमेवाडी क्रॉससह शहरातील रस्तेही खड्ड्यांनी भरले; दरवर्षीची तीच कहाणी
खानापूर | प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था ही वर्षानुवर्षांची वेदनादायक कहाणी झाली आहे. शहरातील नवीन बसस्थानक प्रवेशद्वार, जांबोटी-खानापूर रस्ता, रुमेवाडी क्रॉस, आणि इतर अनेक ग्रामीण भागांतील रस्त्यांवर खड्ड्यांनी आपली हजेरी लावली आहे. पावसाळा आला की हे खड्डे अधिक उग्र रूप धारण करतात.
स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी, निवेदने व मागण्या केल्या आहेत. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं उत्तर मात्र नेहमीच एकसारखं – “काम लवकरच सुरू होईल.” पण प्रत्यक्षात काम सुरू होण्याऐवजी परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे.
खड्ड्यांचे साम्राज्य: शहर ते खेडं सगळीकडेच!
नवीन बसस्थानक प्रवेशद्वार हे ठिकाण म्हणजे पावसात गटारासारखं पाणी वाहणारा रस्ता झाला आहे. पेव्हर्स टाकून तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेली जाते, पण धोका मात्र कायम असतो. शालेय विद्यार्थी, पादचारी व दुचाकीस्वार यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.
जांबोटी-खानापूर रस्ता दरवर्षी वाहतुकीसाठी धोकादायक ठरतो. डांबरीकरण झालं तरी तो फार काळ टिकत नाही. यंदातर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
रुमेवाडी क्रॉस ते करंबळ क्रॉस हा मार्ग तर इतका खराब झाला आहे की रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे आहे, हेच समजत नाही. त्यामुळे वाहनचालकांना अपघातांची भीती कायम वाटते.
खेड्यांना जोडणारे असंख्य रस्ते
पत्रकारही थकले… स्थिती जैसे थे!
पत्रकार दरवर्षी आपला परीने आवाज उठवत असतात. त्यांना आता असं वाटू लागलं आहे की, “मागील वर्षी लिहिलेली बातमीच जशीच्या तशी छापली तरी चालेल!” कारण परिस्थिती काहीही बदलत नाही.
नागरिक म्हणतात, “दरवर्षी पत्रकार येतात, बातम्या होतात, आमदार येऊन पूजा करतात आणि निघून जातात. त्यानंतर मात्र काहीच घडत नाही. कोणतंही ठोस काम होत नाही.”
शासकीय यंत्रणा गप्प, जनता मात्र त्रस्त
सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समित्या आणि स्थानिक नगरपंचायत एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात मग्न आहेत. “अनुदान आलं की काम सुरू करू”, “हवामान सुधारल्यावर दुरुस्ती करू” अशी कारणं दरवर्षी ऐकायला मिळतात. पण तोवर अपघात, गैरसोयी आणि नागरिकांचा संताप वाढतच जातो