खानापूर

लैला शुगर आता ‘खानापूर श्री महालक्ष्मी शुगर लिमिटेड’: नव्या जोमाने व विश्वासाने गाळप हंगाम सुरू! | ಲೈಲಾ ಶುಗರ್ಸ್ ಈಗ ‘ಖಾನಾಪುರ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಶುಗರ್ ಲಿಮಿಟೆಡ್’: ನೂತನ ಉತ್ಸಾಹ ಮತ್ತು ನಂಬಿಕೆಯೊಂದಿಗೆ ಅರೆಯುವ ಹಂಗಾಮು ಆರಂಭ!

खानापूर: खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे काळीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी संचलित ‘श्री महालक्ष्मी साखर कारखान्या’च्या २०२६-२०२७ या गाळप हंगामाचे बॉयलर पूजन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा कारखान्याचे चेअरमन श्री. विठ्ठलराव हलगेकर आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. रुक्मिणी विठ्ठलराव हलगेकर यांच्या शुभहस्ते बॉयलरमध्ये अग्निप्रज्वलन करून या हंगामाची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

नव्या नावाखाली पहिला गाळप हंगाम

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना चेअरमन तथा आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले, “पूर्वीच्या ‘लैला Sugar’ कंपनीच्या नावात बदल करून आता दिल्ली सरकारकडून ‘खानापूर श्री महालक्ष्मी शुगर लिमिटेड’ या नावाने नवीन मान्यता मिळाली आहे. या नव्या नावाखालीच आपल्या कारखान्याचा हा पहिला गाळप हंगाम बॉयलर पूजनाने सुरू होत आहे. परिसरातील कुप्पटगिरी, दडुहोसूर आणि बलोगा या तिन्ही गावांतील जनता व ग्रामदैवतांच्या आशीर्वादामुळेच हा कारखाना सुरू झाला आहे. मागील तीन वर्षे आपण सर्वांनी हा कारखाना यशस्वीपणे चालवला असून, आता नव्या हंगामात नव्या जोमाने व विश्वासाने उतरलो आहोत.”

शेतकऱ्यांना डिसेंबरपासून ॲडव्हान्स रक्कम

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही देत ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना ऊस तोडणीच्या वेळी कोणतीही अडचण भासू नये, यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वीच ‘ॲडव्हान्स’ रक्कम देण्याची योजना आपण आखली आहे. डिसेंबर महिन्यापासून तोडणीसाठी जास्तीत जास्त ॲडव्हान्स रक्कम देऊन शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत केली जाईल, जेणेकरून त्यांना कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.”

ऊस दराबाबत महत्त्वाची घोषणा

उसाच्या दराबाबत स्पष्टीकरण देताना आमदार हलगेकर म्हणाले:

“गेल्या वर्षी रयत संघटनेच्या वतीने आणि सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच आम्ही कारखान्यातून ऊस दर दिला आहे. या वर्षीसुद्धा रयत संघटनेसोबत दराबाबत अधिकृत चर्चा सुरू आहे. संघटना जो काही दर अंतिम करेल, त्यानुसारच कारखान्यातून शेतकऱ्यांना ऊस दर दिला जाईल.”

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टीचे उपाध्यक्ष श्री. विठ्ठल करंबळकर, ज्येष्ठ संचालक श्री. चांगाप्पा निलजकर, लैला साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सदानंद पाटील, भाजप नेते श्री. शंकर पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि कुप्पटगिरी, बलोगा व दडुहोसूर येथील पंच कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या