खानापूरमधील शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला उद्योगसम्राट – काकतकरांचा 75 वा वाढदिवस
सिमाभागातील पुणेस्थित उद्योजकांचे आयडॉल लक्ष्मणराव काकतकर
खानापूर | प्रतिनिधी
आज रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी खानापूर तालुक्यातील मेंढेगाळी येथे जन्मलेले सिमाभागातील पुणेस्थित उद्योजकांचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक व यशस्वी उद्योजक सन्माननीय श्री. लक्ष्मणराव काकतकर यांचा अमृतमहोत्सवी (७५ वा) वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले लक्ष्मणराव काकतकर यांनी कोणताही उद्योग वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण केले. आपल्या आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी स्वबळावर यशस्वी उद्योग साम्राज्य उभं केलं. त्यांच्याकडे होती ती केवळ आत्मविश्वास आणि अपार जिद्द.
चिकाटी, धैर्य, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांशी प्रामाणिक राहून त्यांनी उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. “मोठी स्वप्ने बघा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा” या विचारसरणीचा आदर्श उदाहरण म्हणजे टेक्नोफॅब इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव काकतकर.
कर्तृत्व आणि काव्य यांचा संगम
त्यांच्या जीवनप्रवासाची आठवण करून देणारी विंदा करंदीकरांची ओळी आज अनेकांच्या मनात घोळत आहेत:
“असे जगावे छाताडावर, आव्हानांचे लावून अत्तर…”
अण्णांचे व्यक्तिमत्त्व – गुणांचा खजिना
कर्तव्यनिष्ठा, कठोर परिश्रम, सकारात्मकता, नेतृत्वगुण, माणसांना जोडण्याचे कौशल्य, विनोदी स्वभाव, वेळेप्रमाणे बदलणारी कार्यशैली ही त्यांच्या यशामागची गुरुकिल्ली ठरली. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्वांवर चालणाऱ्या अण्णांचा संवाद वडीलधाऱ्यांशीही त्यांच्या बोलीत आणि प्रेमळपणेच घडतो.
पत्नी अलका वहिनींचा मोलाचा वाटा
या यशामागे अण्णांच्या सहधर्मचारिणी अलका वहिनींचाही सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अण्णांना गरज असलेले स्वातंत्र्य, मोकळीक आणि साथ दिली. मुलं अतुल आणि शितल यांचं उत्तम संस्कार आणि शिक्षणाने संगोपन केलं. विशेष म्हणजे शहरी आणि सुखवस्तू पार्श्वभूमी असूनही त्यांनी गावाकडच्या परिस्थितीला सहज स्वीकारलं.
पुत्र अतुल – इनोव्हेशनचा वारसदार
कुशाग्र बुद्धीचा, टेक्नोसेवी, सर्जनशील अतुलने AI युगाशी सुसंगत ब्रॅंड विकसित करत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. पत्नी दीपिका यांनीही पारंपरिक संस्कार आणि ‘अतिथी देवो भव’ या तत्वांवर घरपण टिकवून ठेवले आहे.
शितल व अनिल – यशस्वी युनिट सांभाळणारे
अण्णांची कन्या शितल आणि जावई अनिल यांनी पावडर कोटिंग युनिट यशस्वीपणे सांभाळले. त्यामुळे अण्णांचे स्वप्न अधिक भव्य झालं.
घराण्याचा व नातेवाईकांचा आधारस्तंभ
अण्णांच्या प्रोत्साहनामुळे अनेक घरातील सदस्यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरभराट झाली. पांडुरंग काकतकर यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा, अनुराधा काकतकर यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा, हे अण्णांच्या प्रेरणेचेच फलित आहे.
गावासाठी – मातृभूमी ऋणातून उतराई
राममंदिर पुनर्निर्माण, गावातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य शिबिरं, वृक्षारोपण, जलसंधारण, शैक्षणिक संस्था अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांत अण्णांचा सहभाग उल्लेखनीय आहे. ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आणि खानापूर-बेळगाव मित्रमंडळात त्यांनी लोकहितार्थ कार्य केले.
तरुणांना दिशा आणि उद्योगात संधी
शेकडो अल्पशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी देऊन, त्यांच्यातील कौशल्य विकसित करून त्यांना स्वबळावर उभं राहण्याचं बळ अण्णांनी दिलं. त्यामुळे सिमाभागातील उद्योजकांमध्ये त्यांचा एक विशेष आदरयुक्त दबदबा आहे.
“लोकल ते ग्लोबल” पर्यंतचा प्रवास
आपल्या कार्यकुशलतेमुळे खानापूर-बेळगावचा झेंडा सातासमुद्रापार नेणाऱ्या अण्णांचा उद्योग प्रवास हा केवळ यशस्वीच नव्हे, तर प्रेरणादायीही आहे. त्यांनी मॅनेजमेंटमधील एक माईलस्टोन गाठला असून आजही ते नवउद्योजकांचे आदर्श ठरतात.
अमृतमहोत्सवी शुभेच्छा
अशा या तेजस्वी, आदर्श व्यक्तिमत्त्वाचे पुढील आयुष्य हे निरोगी, सुखसमृद्ध, आनंदी आणि प्रेरणादायी जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात येत आहे.
सौ. अनुराधा काकतकर (ग्रामविकास अधिकारी)
श्री. पांडुरंग काकतकर (महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त)