बारावीची परीक्षा आजपासून; गैरप्रकार रोखण्यासाठी वेबकास्टिंगचा वापर
बेळगाव: राज्यभर बारावीच्या वार्षिक परीक्षा आजपासून (दि. १) सुरू होत असून, तब्बल ७,१३,८६२ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी यंदा वेबकास्टिंगचा उपयोग केला जाणार आहे.
बारावीच्या परीक्षा १ ते २० मार्च दरम्यान होणार असून, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास मनाई आहे. मात्र, मुख्य अधीक्षकांना कॅमेरा नसलेला साधा मोबाईल जवळ ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २१,५१७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी ४१ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक परीक्षा केंद्रांवर लावण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी दहावी परीक्षेत वेबकास्टिंगचा उपयोग करण्यात आला होता. त्याच धर्तीवर यंदा ११७१ परीक्षा केंद्रांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवून वेबकास्टिंग केले जाणार आहे. वेबकास्टिंग नियंत्रण कक्षातून परीक्षेवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे. कोणत्याही गैरप्रकाराची माहिती मिळताच केंद्रप्रमुखांना तत्काळ सूचित केले जाणार आहे. विद्यार्थी बोलत असल्यास किंवा कॉपी करत असल्यास तातडीने कारवाई होईल.
पोलिस बंदोबस्तात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी आणि पदवीपूर्व कॉलेज प्राचार्य यांची त्रिसदस्यीय समिती परीक्षा व्यवस्थापनावर लक्ष ठेवणार आहे. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निष्कलंक आणि स्वच्छ वातावरणात परीक्षा द्यावी, यासाठी प्रशासन सतर्क आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
