कर्नाटक बंद अपयशी: जनजीवनावर कोणताही परिणाम झाला नाही
बेळगाव, 22 मार्च: काही कन्नड संघटनांकडून आज कर्नाटक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदला कोणत्याही प्रमुख संघटनेचा पाठिंबा मिळाला नाही, त्यामुळे कर्नाटकातील काही मोजकी शहरे वगळता अनके शहरांसह खानापूर आणि बेळगाव शहरात बंद अपयशी ठरला.
सध्या शालेय व महाविद्यालयीन परीक्षा सुरू आहेत, तसेच रमजान सण तोंडावर असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी आहे. त्यामुळे शहरातील आर्थिक व्यवहार आणि दैनंदिन जीवन सुरळीत सुरू राहिले. काही कन्नड संघटनांकडून जुन्या मुद्द्यांना उकरून काढत बंद घडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली.
चन्नम्मा सर्कलयेथे काही कन्नड समर्थक संघटनांनी निदर्शने केली. मात्र बेळगावमध्ये जनजीवनावर कोणताही परिणाम झाला नाही. विविध संघटनांनी बंदला पाठिंबा नाकारला, तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही या बंदबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
सार्वजनिक वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहिली. मध्यवर्ती बस स्थानकातून राज्यभर बस सेवा सुरळीत सुरू होत्या. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव आणि महाराष्ट्र दरम्यानची बस सेवा बंद ठेवण्यात आली. शहरातील वाहतूकही सुरळीत होती, आणि कोणत्याही मोठ्या अडथळ्याची नोंद झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त ठेवला होता. संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आली होती.