खानापूर
खानापूर: मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
खानापूर (ता. १९ मे) – पारवाड (ता. खानापूर) येथील शेतकरी नारायण भिवा हरिजन (वय ४८) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी सुमारास कणकुंबी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण हरिजन यांच्या घरी पारवाड येथे लग्न होते. त्या नंतर ते कणकुंबीत मावशीला सोडण्यासाठी गेले होते. तेव्हा ते घरामागे लघवीसाठी गेले असताना, तेथे मधुमक्षिका पालनासाठी ठेवलेल्या पेट्यांतील मधमाशांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला.
या हल्ल्यात नारायण हरिजन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जांबोटी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना खानापूर येथे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.