हत्तीचा दहशतवाद सुरूच: शेतकऱ्यांची पिके धोक्यात

खानापूर: गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेली टस्कर हत्तीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आधीच अवकाळी पावसाने सुगीच्या काळात चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता हत्तीच्या उपद्रवामुळे आणखी त्रास सहन करावा लागत आहे. हत्ती शेतांमध्ये घुसून उभ्या पिकांची नासाडी करत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. “गजराजा, आता पुरे!” असे आर्त पुकारे देत असताना त्यांच्या हालअपेष्टा अधिकच वाढल्या आहेत.
सध्या जळगे जवळील वनखात्याच्या चंदनवाटिकेत हत्तीने मुक्काम ठोकला आहे. करंबळ, जळगे, कारलगा या भागातील भात पिकांवर त्याने धुमाकूळ घातला आहे. मलप्रभा नदीतील मुबलक पाणी आणि संपन्न भातपिकं असल्याने हत्ती या भागातून हलण्यास इच्छुक दिसत नाही. त्यामुळे अर्धा तालुका हत्तीच्या दहशतीखाली असून, वनविभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांच्या संतापाला उधाण आले आहे.
वनविभागाने निलावडे, कबनाळी, आंबोळी या yrtt डोंगराळ आणि घनदाट जंगल भागात हत्तीला पकडणे कठीण असल्याचे कारण दिले आहे. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून हत्ती सपाट प्रदेशात तळ ठोकून आहे, त्यामुळे तो पकडण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही, वन विभागाची उदासीनता आणि कारवाईच्या अभावामुळे शेतकऱ्यांना पिकांची नासाडी फक्त बघत बसण्याची वेळ आली आहे. एकीकडे बिबट्याचा धोका, दुसरीकडे अवकाळी पाऊस, आणि आता हत्तीचा उपद्रव यामुळे शेतकऱ्यांचे जीवन असह्य बनले आहे.

टस्कराला पकडून अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी राज्य वनविभागाची परवानगी लागते. ही परवानगी घेण्यासाठी जिल्हा वनाधिकाऱ्यांमार्फत युद्धपातळीवर पाठपुरावा सुरू आहे. हत्तींसाठी राखीव असलेल्या जंगलात या टस्कराला सोडण्याचे नियोजन आहे. टस्कराला पकडण्यासाठी शिमोगा येथील सकरेबैल हत्ती अभयारण्यातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. सध्या ३० वन कर्मचाऱ्यांचे पथक टस्कराच्या हालचालीवर २४ तास लक्ष ठेवून आहे. लोकवस्तीत टस्कर घुसणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे. -श्रीकांत पाटील, आरएफओ, खानापूर
