मानव-हत्ती संघर्ष आता थांबणार, जवळच्या हत्तीची हालचाल अशी ट्रॅक होणार
बंगळुरू: कर्नाटकचे पर्यावरणमंत्री ईश्वर खांड्रे यांनी बुधवारी के पी ट्रॅकर या स्वदेशी GSM-आधारित हत्तींच्या रेडिओ कॉलरचे लोकार्पण केले. हा रेडिओ कॉलर कर्नाटकच्या वन विभागाने इनफिक्शन लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने तयार केला आहे. याचा वापर हत्तींची हालचाल ट्रॅक करण्यासाठी होणार आहे, ज्यामुळे मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यास मदत होईल.

खांड्रे यांनी सांगितले की जंगल परिसर लोकवस्ती भागात हत्तींच्या हालचालींमुळे त्रास होत होता. मात्र आता या रेडिओ कॉलरच्या मदतीने स्थानिकांना हत्तींच्या हालचालीची वेळेत माहिती मिळणार आहे.
हे कॉलर सध्या बंडीपूर व नागरहोळी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
हत्तींसाठी देशातील सर्वात मोठे अधिवास असलेले राज्य
खांड्रे म्हणाले की, कर्नाटकात 6,395 हत्ती असून हे देशातील सर्वाधिक हत्तींची संख्या असणारे राज्य आहे. मात्र, जंगल क्षेत्र वाढत नसल्याने मानव-हत्ती संघर्ष वाढत आहे.
हे कॉलर पर्यावरणपूरक साहित्य वापरून तयार करण्यात आले आहेत. यामध्ये बॅटरी, बल्ब किंवा सर्किट खराब झाल्यास ते दुरुस्त करता येते, सारा डेटा स्थानिक सर्व्हरवर सुरक्षित साठवला जाणार आहे.
आता हत्तींसाठी कॉलर तयार असून पुढच्या टप्प्यात वाघ आणि बिबट्यांसाठी असे कॉलर तयार केले जाणार आहेत. असे खाड्रे म्हणाले.
पुढे कर्नाटक वन विभागाने सांगितले की, या कॉलरमुळे हत्तींच्या हालचालींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल.
