खानापूर: डिजिटल अरेस्टच्या धमकीनंतर 6 लाख गमावले, शेवटी दोघांनीही जीवन संपवले
खानापूर: काही दिवसांपासून डिजिटल अरेस्टच्या अनेक घटना आपण ऐकत आहोत. अश्याच प्रकारची घटना खानापुर तालुक्यातील बीडी गावात घडली आहे. सायबर गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉलवरून अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याने एक वृद्ध दाम्पत्य आत्महत्येस प्रवृत्त झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

वृद्ध रेल्वे निवृत्त कर्मचारी डिएगो नझरेथ (83) आणि त्यांची पत्नी पाविया नझरेथ (79) यांनी आत्महत्या केली. गेल्या महिन्याभरापासून हे दाम्पत्य सायबर गुन्हेगारांच्या त्रासाला कंटाळले होते. तपासात पोलिसांना इंग्रजीत लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये डायगो यांनी लिहिले आहे की, जानेवारी महिन्यापासून एक व्यक्ती त्यांच्यावर खोटे आरोप करत होता. तो स्वतःला दिल्लीतील बीएसएनएलचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता आणि सांगत होता की, डायगो यांच्या सिम कार्डचा गैरवापर झाला असून त्यांना “डिजिटल अटक” करण्यात येणार आहे. या धमक्यांसोबतच तो वारंवार पैसे मागत होता आणि त्यामुळे या दाम्पत्याने सुमारे पाच ते सहा लाख रुपये फसवणूक करणाऱ्याला दिल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.
सतत होणाऱ्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून दोघांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. डायगो यांनी गळ्यावर धारदार हत्याराने वार केला आणि जीव जात नाही हे लक्षात आल्यानंतर पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज आहे. तर फ्लेविया यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
मृतदेह पुढील तपासणीसाठी खानापूर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मृत्यूचे कारण अधिकृतरीत्या अद्याप स्पष्ट नसले तरी नंदगड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात नोंदवला आहे. पोलिसांनी सुसाईड नोट, मोबाईल फोन आणि धारदार विळा ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
डायगो नाझरेथ हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातून निवृत्त झाले होते. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मृत्यूनंतर मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांच्या इच्छेनुसार दोघांचेही मृतदेह बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दान केले आहेत.