अश्लील वक्तव्य, आमदार अटकेत, खानापूर पोलिस स्थानकात गोंधळ


खानापुर: महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य सी.टी. रवी यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री आठ वाजता त्यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले.

विधान परिषदेतील वादग्रस्त वक्तव्य
सुवर्णसौध येथे सुरू असलेल्या विधान परिषदेच्या चर्चेदरम्यान, सी.टी. रवी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरली, असा आरोप आहे. या घटनेनंतर मंत्री हेब्बाळकर भावुक होऊन सभागृह सोडून गेल्या. त्यांच्या समर्थकांनी सी.टी. रवी यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसची कारवाईची मागणी
या प्रकरणावर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवत विधान परिषदेच्या सभापतींकडे तक्रार दिली. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 75 आणि 79 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सी.टी. रवी यांना ताब्यात घेतले.
सी.टी. रवी यांचा आरोप
सभागृहाबाहेर पडल्यानंतर आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा सी.टी. रवी यांनी केला आहे.
खानापूर पोलिस स्थानकात हलविणे
बेळगाव ग्रामीण भागातील तणाव टाळण्यासाठी सी.टी. रवी यांना रात्री खानापूर पोलिस स्थानकात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चौकशीची प्रक्रिया सुरू होती.

भाजप नेत्यांचा गोंधळ
सी.टी. रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात हलवल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पोलिस स्थानकाबाहेर गर्दी करत आक्रमक भूमिका घेतली. उत्तर विभागाचे पोलिस महासंचालक विकास कुमार आणि पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पोलिस स्थानकात प्रवेश रोखल्याने भाजप नेत्यांनी गोंधळ माजवला.
राजकीय वातावरण तापले
या घटनेमुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तणाव वाढला असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणावरून राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

