प्रयागराजहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात; बेळगावच्या सहा जणांचा मृत्यू
जबलपूर, 24 फेब्रुवारी – प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून परतणाऱ्या गोकाक (बेळगाव) येथील भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या बसला धडकली. या अपघातात कारमधील सहा जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त कार (क्र. केए 49 एम 5054) गोकाकमधील भाविक घेऊन प्रवास करत होती. पहाटे चारच्या सुमारास जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्याने धडक प्रचंड जोरात झाली आणि कारचे छत अक्षरशः उध्वस्त झाले.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे:
भालचंद्र नारायण गौडर (५०, लक्ष्मी बडवणे, गोकाक), सुनील बाळकृष्ण शेडशाळ (४५, हत्तरकी-आनंदपूर, गोकाक), बसवराज निरपादप्पा कुर्ती (६३, गोंबडी, गोकाक), बसवराज शिवाप्पा दोडमणी (४९, गुरुवार पेठ, गोकाक), इराण्णा शंकराप्पा शेबिनकट्टी (२७, कमतगी, गुळेदगुड्ड) आणि वीरूपाक्ष चन्नाप्पा गुमती (६१, गुरुवार पेठ, गोकाक) यांचा समावेश आहे.
गंभीर जखमी:
मुस्ताक (सिंधी कुरबेट) आणि सदाशिव केदारी (उपलाळी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर जखमींना तातडीने सिहोरा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि नंतर जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेची नोंद खितौला पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
