रेणुका यल्लमा मंदिर विकासासाठी भरीव निधी, विकास कामांसाठी मागवल्या निविदा
बेळगाव: कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा देवी मंदिराचा विकास करण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागांतर्गत प्रसाद योजनेतून या मंदिराचा कायापालट होणार आहे. नुकतेच या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, त्यामुळे लवकरच मंदिर परिसराचा विस्तार आणि सौंदर्यीकरण होणार आहे.

पर्यटन विभागाने 1 हजार 837.27 लाख रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पावसाळ्याचा विचार करून पुढील नऊ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची अट आहे. या निधीतून मंदिराचा विस्तार करण्यासोबतच नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
श्री रेणुका देवी मंदिराला वर्षभर लाखो भाविक भेट देतात. मात्र, या ठिकाणी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जाते. याला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने भरीव निधी मंजूर केला असून लवकरच विकासकामांना सुरुवात होणार आहे.
इच्छुक कंत्राटदारांना या निविदेमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास झाल्यास भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील तसेच पर्यटनाला चालना मिळणार आहे.