तोपिनकट्टी हायस्कूलच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी एकवटले
खानापूर:तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीच्या तोपिनकट्टी हायस्कूलच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी आणि विश्वस्त समिती एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी ठोस निर्णय घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

सध्याच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी हायस्कूलच्या सर्व समस्या सोडवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
या बैठकीत शाळेतील अपुरी बेंचेस, इमारतीची रंगरंगोटी, वाचनालयाची उभारणी, विज्ञान प्रयोगशाळेतील सोयी-सुविधा यांसारख्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा निर्णय झाला.
या वेळी शाळेचे सर्वेसर्वा सुरेश विठ्ठलराव देसाई, भैरूअण्णा शहापूरकर, इराप्पा पाटील, शिवाजी गुरव यांच्यासह विविध मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला. हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एस. आरगू यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले.
माजी विद्यार्थी अशोक गुणापाचे, विलास शहापूरकर, मारुती गुरव यांनी यावेळी आपले विचार मांडले. निलेश गुरव, ज्योतिबा गुरव, बाबुराव शहापूरकर, महादेव तीरवीर, संजू करंबळकर, संभाजी हलगेकर, मनोहर गुरव ,नागेंद्र गुंजीकर,शिवाजी गुंजीकर,शिरीष देसाई,रामचंद्र होसूरकर,नागेशी पाटील,परशरम गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी एल. डी. पाटील यांनी आभार मानले.

