ओलमणी येथे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या कार्यक्रमाने स्नेहसंमेलन रंगले
खानापूर: राजर्षी शाहू हायस्कूल, ओलमणी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. तुकाराम हनुमंतराव साबळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे डीसीपी सी. वाय. पाटील, डीएसपी श्री. हिरेगौडर, तसेच प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. रवी इचलकरंजी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या इशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महेश म्हात्रू नाईक (बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर) यांच्या हस्ते झाले. शाळेचे मुख्याध्यापक सी.एस. कदम यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

पाहुण्यांचे मार्गदर्शन
डीसीपी सी. वाय. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संघर्ष आणि चिकाटीचे महत्त्व पटवून देत परीक्षांसाठी नेहमी तयार राहण्याचा सल्ला दिला. डीएसपी श्री. हिरेगौडर यांनी प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे महत्त्व समजावत आयएएस, आयपीएस, केपीएससी, एमपीएससी या परीक्षांचे मार्गदर्शन केले. डॉ. रवी इचलकरंजी यांनी ओलमणी गावकऱ्यांसाठी मोफत हेल्थ कार्ड देण्याचे आश्वासन दिले.
गौरव आणि सन्मान सोहळा
कार्यक्रमात इंडो-तिबेटियन पोलीस फोर्समध्ये निवड झालेल्या पहिल्या मुलीचा सत्कार करण्यात आला. कर्नाटक राज्यात सीआयपीएफ परीक्षेत प्रथम आलेल्या नागेश राऊत यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष
विद्यार्थ्यांनी मराठी लोकपरंपरा जपणाऱ्या “उमंग” या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने झाली. गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील रसिकांनी या भव्य सोहळ्याचा आनंद घेतला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवर्ग आणि गावकऱ्यांनी विशेष योगदान दिले. सूत्रसंचालन ए. जे. सावंत यांनी केले, तर आभारप्रदर्शन एस. आय. काकतकर यांनी व्यक्त केले.
संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला आणि संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
