ओलमणी राजर्षी शाहू हायस्कूल, येथे विज्ञान प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ

ओलमणी: सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे, आणि यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून यशस्वी वाटचाल करावी, या उद्देशाने राजर्षी शाहू हायस्कूल, ओलमणी येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विज्ञान गीताने झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन खंडोबा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर उद्योजक राघोबा चव्हाण, शाळा सुधारणा मंडळाचे चेअरमन तुकाराम साबळे, डॉक्टर सुरज साबळे, तसेच मंडळाचे सदस्य हनमंत जगताप उपस्थित होते.

शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन राघोबा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, तर उपस्थित पालकांच्या शुभहस्ते रोपट्याला पाणी घालून प्रदर्शनाला सुरुवात झाली.
विज्ञान शिक्षिकांनी आपल्या प्रस्ताविकेतून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड कशी निर्माण करता येईल, यावर भर दिला. मुख्याध्यापक सी. एस. कदम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या एकत्रित उपयोगाने यशस्वी होण्याचे मार्गदर्शन केले.

या प्रदर्शनात जवळपास 90 विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती सादर केल्या. यामध्ये उपग्रह प्रक्षेपण, पवनचक्की, ग्रास कटिंग मशीन, पवन ऊर्जा, मानवी हृदय, सौरमंडळ, पाण्याचे शुद्धीकरण अशा प्रकल्पांचा समावेश होता.
परीक्षक म्हणून मुख्याध्यापक पांडुरंग चव्हाण व महेश साबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तुकाराम साबळे यांनी पालकांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्रित काम करून या विज्ञान युगात पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
