4.41 कोटींची मालमत्ता कशी जमवली? गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल
खानापूरचे तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांच्या बेळगावातील निवासस्थान, कार्यालय आणि इतर ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी बुधवारी (ता. 8) छापे टाकले. या कारवाईत त्यांच्याकडे तब्बल 4 कोटी 41 लाख 12 हजार 581 रुपयांची मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. लोकायुक्त पोलिसांनी त्यांच्या संपत्तीचा स्रोत तपासण्याचे काम हाती घेतले असून कर्नाटक लोकायुक्त कायद्यानुसार गुन्हाही नोंदवला आहे.
8 ठिकाणी छापेमारी
बेळगावातील गणेशपूरमधील गायकवाड यांच्या ‘कुबेर’ बंगल्या, खानापूरमधील निवासस्थान, तहसीलदार कार्यालय, निपाणीतील फार्महाऊस, तसेच अकोळ येथील सासऱ्यांचे घर अशा एकूण 8 ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर संशयास्पद कागदपत्रे आणि संपत्ती उघड झाली आहे.
संपत्तीचे विवरण
प्रकाश गायकवाड यांच्याकडे पुढील संपत्ती आढळली आहे:
- स्थावर मालमत्ता: 3 कोटी 58 लाख (2 प्लॉट, 3 बंगले, 28 एकर शेती)
- जंगम मालमत्ता: 83 लाख 12 हजार 581 (दागिने: 25.66 लाख, वाहने: 57 लाख, रोकड: 46 हजार)
राज्यात 21 कोटींच्या मालमत्तेचा खुलासा
कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये, लोकायुक्तांनी 38 ठिकाणी छापेमारी केली. यात 21 कोटी 5 लाख 15 हजार 745 रुपयांची मालमत्ता जप्त झाली. अधिकाऱ्यांनी 14 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम भूखंड आणि बंगले खरेदीत गुंतवली असून 2 कोटी रुपयांची वाहने आणि जवळपास 2 कोटींचे दागिनेही खरेदी केल्याचे आढळले आहे.
लोकायुक्त पोलिस तपासणी सुरू असून पुढील कारवाईसाठी संबंधित कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे.
