खानापूरात आमदार हलगेकर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
खानापूर : कर्नाटक सरकारच्या १५व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून खानापूर शहरातील शिवस्मारक चौक ते ज्ञानेश्वर मंदिर या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी ३२ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. २१) कुदळ मारून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खानापूर नगरपंचायतीचे अभियंते तिरुपती राठोड यांनी प्रास्ताविक केले, तर चीफ ऑफिसर संतोष कुरबेट यांनी आमदार विठ्ठल हलगेकर व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, “शहराचे सौंदर्य वाढवायचे असेल तर चांगले रस्ते आणि गटारी अत्यावश्यक आहेत. यासाठी १५व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. उर्वरित शिवस्मारक चौक ते रेल्वे स्टेशन मार्गाचे काम लवकरच पीडब्ल्यूडीच्या अनुदानातून सुरू करण्यात येणार आहे. तसेच मराठा मंडळ डिग्री कॉलेज ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचेही डांबरीकरण करण्यात येणार आहे.”
यावेळी भाजपा माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, मल्लप्पा मारीहाळ, सदानंद पाटील, गुंडू तोपिनकट्टी, राजेंद्र रायका, समितीचे नेते प्रकाश चव्हाण, नगराध्यक्षा सौ. मिनाक्षी बैलूरकर, उपनगराध्यक्षा जया भुतकी, नगरसेवक लक्ष्मण मादार, प्रकाश बैलूरकर, नारायण ओगले, मजहर खानापूरी, रफिक वारेमणी, आप्पया कोडोळी, नगरसेविका मेघा कुंदरगी, राजश्री तोपिनकट्टी, लता पाटील, तसेच अभियंते तिरुपती राठोड, श्री. कांबळे, प्रेमानंद नाईक, राजू जांबोटी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विनोद संनदी यांनी उपस्थितांचे आभार मानले.