खानापूर येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन: भजन, गायन, मृदंग व संगीताचे प्रशिक्षण
खानापूर: येथील शातिनिकेत पब्लिक स्कूल (कुप्पटगिरी रोड) येथे दिनांक 15 एप्रिल 2025 ते 2 मे 2025 या कालावधीत बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वारकरी सांप्रदायिक भजन, गायन, पेटी व मृदंग वादन, तसेच रागधारी क्लासिकल संगीताचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे शिबिर ह.भ.प. श्री. सद्गुरु विठ्ठल (दादा) वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार श्री. विठ्ठल सोम्माणा हलगेकर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला ह.भ.प. शंशीकांत गावडे (गुरुजी) व खानापूर तालुक्यातील सर्व ज्ञानेश्वर पारायण मंडळांचे विशेष योगदान लाभणार आहे.
शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे बाळकडू देणे हा असून, रोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये मृदंग व अभंग सराव, हरिपाठ, मृदंग क्लासेस, गायन व भजन सराव, संत चरित्र वाचन, तसेच भोजन व विश्रांतीचा समावेश आहे.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय किमान 11 वर्षे असावे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःची वळकटी, ताट-वाटी, तांब्या, वही, पेन, लहान बॅटरी, आणि मृदंग शिकणाऱ्यांनी स्वतःचा मृदंग घेऊन येणे आवश्यक आहे. वारकरी पोशाख आणि टोपी अनिवार्य असून, विद्यार्थ्यांकडून फक्त 500 रुपयांची वर्गणी स्वीकारली जाणार आहे.
शिबिरात भोजनाची सोय करण्यात आली आहे आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
खानापूर परिसरातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि अध्यात्म, कला व साधना यांची गोडी लहान वयापासून अनुभवावी , असे आवाहन आयोजकांनी केले आहे.