उद्या कालमणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती व ग्रंथालय उपक्रमाचा प्रारंभ
खानापूर: तालुक्यातील कालमणी गावात भारतरत्न, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिलीच मूर्ती साकारण्यात येणार आहे. त्यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सोमवार, 14 एप्रिल रोजी या ऐतिहासिक उपक्रमाचा प्रारंभ होणार असून, मूर्ती निर्माणपूर्व तयारीसाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश बा. गावडे, आमटे कृषी पतसंघाचे उपाध्यक्ष बळवंत नाईक, सिध्देश्वर सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद भरणकर, भूविकास बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर, भाजप नेते पंडित ओगले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच जांबोटी विभागाचे सीआरसी विठोबा दळवी आणि जय हनुमान सोसायटीचे अध्यक्ष शाहू राऊत प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने ‘सुसज्ज ग्रंथालय’ उभारणार
मूर्ती स्थापनेसोबतच कालमणी ग्रामस्थांनी एक सुसज्ज ग्रंथालय उभारण्याचा संकल्प केला आहे. या ग्रंथालयात भारतातील थोर पुरुष व महिलांची चरित्रे, प्रेरणादायी पुस्तके मोफत वाचनासाठी उपलब्ध असतील. यामागचा उद्देश म्हणजे आजच्या तरुणांना मार्गदर्शन मिळावे व समाजात सकारात्मक परिवर्तन घडावे, असे ग्रामस्थ प्रतिनिधी अनिल कालमनकर यांनी सांगितले.
या ऐतिहासिक उपक्रमामुळे कालमणी गावाच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
