ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सभेत सेंद्रिय शेतीवर भर, बसवानी निलजगी यांचा सत्कार | ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಹಾಗೂ ನಿವೃತ್ತ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘದ ಜಂಟಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಾವಯವ ಕೃಷಿಯ ಸಂದೇಶ; ಬಸವಾನಿ ನಿಲಜಗಿ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ
खानापूर, दि. 15 : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना आणि खानापूर तालुका, कर्नाटक राज्य सेवानिवृत्त सरकारी नोकर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 13 जुलै 2026 रोजी श्री ज्ञानेश्वर मंदिर, खानापूर येथे संयुक्त सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोशी होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे सचिव सी. एस. पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर संघटनेतील दिवंगत सदस्य तसेच गावातील दिवंगत नागरिकांना दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षक एल. डी. पाटील यांनी संघटनेचा वार्षिक अहवाल सविस्तर वाचून दाखविला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व देवतापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कानशिनकोप (ता. खानापूर) येथील प्रगतशील शेतकरी बसवानी निलजगी यांनी आपल्या शेतीतील सेंद्रिय शेतीचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. त्यांनी आपल्या शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद करून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला तसेच विविध औषधी वनस्पतींचे उत्पादन यशस्वीरीत्या घेत असल्याची माहिती दिली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार व मानाची पगडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
निलजगी यांनी आपल्या मार्गदर्शनात सेंद्रिय शेतीचे महत्त्व, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, नैसर्गिक शेतीचे पर्यावरणपूरक व आरोग्यदायी फायदे याविषयी सविस्तर विवेचन केले. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारतो, उत्पादनाचा दर्जा उंचावतो तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कमी होतो, असे त्यांनी सांगितले. अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेताला भेट देऊन सेंद्रिय शेतीची माहिती घ्यावी, आधुनिक तंत्रज्ञानासोबत नैसर्गिक शेतीचा स्वीकार करावा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी अन्ननिर्मितीकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नुकताच त्यांना मिळालेल्या बेळगाव जिल्हास्तरीय ‘बेस्ट कृषी एक्स्पोर्ट स्टार’ पुरस्काराबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. होसूर येथील प्रतिनिधींनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात व्ही. एम. बनोशी यांनी संघटनेच्या आगामी उपक्रमांची माहिती देत विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. संघटनेच्या कार्यविस्तारासाठी सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास व्यासपीठावर सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ हेब्बाळकर, पांडुरंग डिझोळेकर, कर्नाटक राज्य सेवानिवृत्त सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष शिवानंद कुंकेरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले, तर प्रा. उमाकांत वाघधरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सेंद्रिय शेतीचा प्रसार, निरोगी जीवनशैलीचा स्वीकार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही संयुक्त सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
