शिक्षकाच्या आत्महत्येने खानापूर तालुका हादरला

खानापूर: नंदगड गावचे रहिवासी आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कन्या हायस्कूलमध्ये शिक्षक असलेले संदीप प्रभाकर शिंदे (वय 44) यांनी 26 ऑक्टोबर रोजी, शनिवारी दुपारी 2.30 च्या सुमारास बेळगाव-पणजी महामार्गावरील पारिषवाड कत्री येथील पुलाजवळ झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, दोन विवाहित भाऊ, आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. खानापूर तालुक्यात दोन दिवसांत घडलेली ही पाचवी आत्महत्येची घटना आहे, ज्यामुळे तालुका हादरला आहे.

सविस्तर माहितीनुसार, संदीप शिंदे नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेले होते. पोटदुखीचे कारण देऊन त्यांनी हेडमास्तरांकडून रजा घेतली आणि घराकडे निघाले. त्यांच्या शाळेला लागूनच असलेल्या कॉलेजमध्ये त्यांची पत्नी प्रिन्सिपल आहेत. मात्र त्यांनाही काहीही न सांगता संदीप शिंदे घराकडे रवाना झाले. त्यांच्या अचानक गायब झाल्याने त्यांच्या पत्नी चिंतेत होत्या, आणि त्याच दरम्यान त्यांना या दुःखद घटनेची माहिती मिळाली.
या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी दोन दिवसांत घडलेल्या पाच आत्महत्यांच्या घटनांमुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
