खानापूर तालुक्यातील भाविकांची सौंदत्ती यात्रेला मोठी उपस्थिती
खानापूर: सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ असतेच, मात्र चैत्र पौर्णिमेच्या यात्रेसाठी विशेषतः लाखोंच्या संख्येने भाविक सौंदत्ती डोंगरावर एकत्र येतात. यंदाही चैत्र पौर्णिमा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
खासकरून खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले असून, डोंगरावर भक्तांनी मोठ्या श्रद्धेने गर्दी केली आहे. कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून आलेले भक्त यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढत आहेत.
सांगली, कोल्हापूर, बेळगाव, निपाणी, सातारा आणि चंदगड परिसरातील भाविक पारंपरिक पद्धतीने डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या विविध यात्रांत सहभागी होतात. मात्र, चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला खानापूर आणि हलियाळ भागातील भक्तांची विशेष उपस्थिती दिसून येते. यंदाही तीच परंपरा कायम राहत, रेणुका देवीच्या दर्शनासाठी खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने हजर असल्याचे चित्र दिसत आहे.