कणकुंबीतून उठणार पर्यावरण संरक्षणाचा एल्गार; 13 जूनपासून राखणदार यात्रा
कणकुंबी/सिंधुदुर्ग : सह्याद्री आणि कोकणातील नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणासाठी ‘कोकणी रानमाणूस’ म्हणून परिचित असलेले पर्यावरणप्रेमी प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘राखणदार यात्रा’ १३ जून २०२६ रोजी कणकुंबी येथून प्रारंभ होणार आहे. जल, जंगल, जमीन आणि स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या कणकुंबी गावातून सुरू होणारी ही यात्रा विविध गावांमधून मार्गक्रमण करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्लीपर्यंत पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान स्थानिक नागरिक, शेतकरी, युवक आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधून जंगल संवर्धन, जलस्रोतांचे जतन, जैवविविधतेचे महत्त्व आणि शाश्वत विकास याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
अलीकडच्या काळात वाढते जंगलतोडीचे प्रमाण, जलस्रोतांवरील ताण, खाणकाम आणि विविध विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा महत्त्वाची मानली जात आहे. पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती यांचे नाते जपत विकासाचा मार्ग शोधण्याची गरज यात्रेद्वारे अधोरेखित केली जाणार आहे.
प्रसाद गावडे यांनी गेल्या काही वर्षांत कोकणातील निसर्ग, ग्रामीण जीवनशैली, स्थानिक अन्नसंस्कृती आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर व्यापक जनजागृती केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना निसर्ग संवर्धनाशी जोडण्याचे काम केले असून ‘राखणदार यात्रा’ हा त्या अभियानाचाच पुढचा टप्पा मानला जात आहे.
यात्रेत सहभागी होण्यासाठी पर्यावरणप्रेमी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आले असून, “निसर्गाचे रक्षण हीच भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी” हा संदेश यात्रेद्वारे दिला जाणार आहे.
