‘खानापूर वार्ता’ : एका छंदातून उभा राहिलेला डिजिटल पत्रकारितेचा प्रवास
खानापूर: (लेख 6 जानेवारी ): आज डिजिटल युगात बातमी क्षणात वाचकांपर्यंत पोहोचते. याच डिजिटल पत्रकारितेचा एक छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ‘खानापूर वार्ता’. ‘खानापूर वार्ता’ची सुरुवात कोणत्याही मोठ्या उद्दिष्टाने किंवा व्यवसाय म्हणून झाली नव्हती. ही सुरुवात केवळ एका छंदातून झाली. आपल्या गावावर, तालुक्यावर प्रेम असल्याने “काहीतरी लिहावे” असे वाटत होते. तीच भावना हळूहळू प्रत्यक्षात कधी उतरली, हे समजलेच नाही.
मी प्रसाद रमेश पाटील, खानापूर तालुक्यातील तिवोली गावाचा सुपुत्र. आयटी क्षेत्रात नोकरी करत असताना कोरोना काळात वर्क फ्रॉम होम सुरू होते. ड्युटी संपल्यानंतर मिळणाऱ्या फावल्या वेळेत काहीतरी सकारात्मक करावे, या विचारातून स्थानिक घडामोडींवर लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला सोशल मीडियावर पोस्ट टाकत राहिलो. वडिल आणि भाऊची साथ मिळत गेली. यानंतर लक्षात आले की, या लिखाणासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ असावे. स्वतः सॉफ्टवेअर अभियंता असल्याने एक वेबसाईट तयार केली आणि त्यावर बातम्या प्रसिद्ध करायला सुरुवात झाली. अशा प्रकारे ‘खानापूर वार्ता’ वेबसाईटचा जन्म झाला.
वेबसाईटनंतर WhatsApp ग्रुप्स सुरू करण्यात केले. हळूहळू हे ग्रुप्स वाढत गेले आणि आज खानापूर तालुक्यातील हजारो नागरिक या माध्यमाशी जोडले गेले आहेत. सध्या तब्बल 36 WhatsApp ग्रुप्स कार्यरत असून प्रत्येकी 900 ते 1000 सदस्य आहेत. म्हणजेच सुमारे 36 हजार वाचक थेट जोडले गेले आहेत. याचबरोबर वेबसाईटवर दर महिन्याला सरासरी 3 ते 4 लाख व्हिजिटर्स भेट देतात. Instagram वरही 30 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच वेबसाईटला Google AdSense मंजुरी मिळाली असून, खानापूर तालुक्यातील ही पहिली अशी न्यूज वेबसाईट ठरली आहे. आज खानापूरमधील अनेक प्रश्न, समस्या आणि घडामोडी ‘खानापूर वार्ता’च्या माध्यमातून समोर येत आहेत. त्यामुळे अनेकदा ग्रुपमधील लोक विचारतात –
“खानापूर वार्ताचा पत्रकार किंवा संपादक नेमका कोण आहे?” आज पत्रकार दिन असल्याने असे वाटले की, स्वतःला मोठा पत्रकार संपादक म्हणण्याऐवजी एका छंदातून पत्रकारितेत उतरलेला एक छोटा लेखक म्हणून हा अनुभव मांडावा. खानापूर वार्ताची कोणाशीही स्पर्धा नाही. मात्र माझ्या लिहिलेल्या बातम्या वाचून जर लोकांना प्रश्न पडत असतील, माझी चर्चा होत असेल आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जात असेल, लोकांचे प्रश्न सुटत असतील तर तेच या प्रयत्नाचे यश आहे. महत्त्वाचे म्हणजे, कधीही राजकीय नेत्यांची दोस्ती किंवा त्यांच्या सोबत फिरण्याचा प्रयत्न केला नाही. तालुक्यातील अनेक गावातील हितचिंतक मित्र जी ज्या घडामोडी पाठवतात, त्या माहितीची खात्री करून प्रामाणिकपणे मांडणी केली – आणि आजही तेच सुरू आहे. सध्या रोज नोकरीवर जावे लागते. तरीही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा फावल्या वेळेत थोडा वेळ काढून बातम्या लिहिण्याचा प्रयत्न असतो. ऑफिस आणि जबाबदाऱ्या असूनही दिवसातून किमान एक-दोन बातम्या तरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. एक आवड म्हणून सुरू झालेली ‘खानापूर वार्ता’ आज लोकांचा आवाज बनली आहे.
ही ताकद केवळ माझी नसून, ती तुमच्या विश्वासाची आहे. आणि हा विश्वास असाच कायम राहावा हीच अपेक्षा.
या पत्रकार दिनानिमित्त बातम्या पाठवणाऱ्या सर्व हितचिंतकांना, पत्रकार बांधवांना, मित्रांना आणि माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाला हार्दिक शुभेच्छा!🎉💐
सत्य, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारिता अशीच सुरू राहो, हीच अपेक्षा.
जर कोणाला असाच लिहिण्याचा छंद असेल आणि तालुक्यातील घडामोडींची आवड असेल तर तुमचे खानापूर वार्ता टीममध्ये स्वागत आहे. संपर्क: 8088101547, 8722961718

