नंदगड यात्रेत पहिले पाच दिवस शाकाहारी, 17 फेब्रुवारी नंतर मांसाहारी

खानापूर: नंदगड येथील श्री ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची वार्षिक यात्रा बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. तब्बल बारा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे पहिले पाच दिवस पूर्णतः शाकाहारी राहणार आहेत. या काळात देवीच्या नैवेद्यापासून घरोघरी भोजनव्यवस्था सुद्धा शाकाहारीच असणार आहे.
बुधवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी पहाटे सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर देवीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर देवीची भव्य मिरवणूक होणार असून ती नंदगड गावातील विविध भागांत चार दिवस ओटी भरण्यासाठी फिरणार आहे. या टप्प्यात धार्मिक विधींसह नैवेद्य कार्यक्रम शाकाहारी असतील.
रविवार, दि. 17 फेब्रुवारीपासून धार्मिक परंपरेनुसार मांसाहारी भोजन व्यवस्थेला मान्यता दिली जाईल. त्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव होणार आहे. देवीचा रथ गदगेपर्यंत जाऊन तेथे विराजमान होईल. सायंकाळी चार वाजता देवीसमोर धार्मिक रितीरिवाजानुसार पारंपरिक ‘रेडा फिरवण्याचा’ कार्यक्रम होईल.
या यात्रेदरम्यान गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. पहिल्या टप्प्यात पारंपरिक भक्तिगीते, धार्मिक विधी, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भर देण्यात येणार आहे.
या यात्रेत गावकरी आणि भाविकांनी शाकाहारी व मांसाहारी व्यवस्थेमध्ये संतुलन राखत धार्मिक परंपरेचा मान राखण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

