नंदगडमध्ये कचऱ्याचे ढीग आणि दूषित विहीर, प्रशासन कधी जागे होणार?
खानापूर: तालुक्यातील नंदगड गावातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली आहे. या भागातील कलाळ गल्ली परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, परिसर दूषित झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही स्वच्छतेसाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, त्यामुळे नागरिक नाराज आहेत.

या भागात असलेल्या विहिरीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हिरवट पाण्यामुळे ते वापरण्यायोग्य राहिले नाही. यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत आले आहेत. विहिरीच्या आजूबाजूला शेतजमिनी असून, अशुद्ध पाण्याचा शेतीवरही परिणाम होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरात कचरा टाकला जात असल्याने डुकरांचा त्रासही वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून यासंबंधी तक्रारी केल्या जात असल्या तरी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन स्वच्छता मोहिम राबविणे गरजेचे आहे. जर स्थानिक पातळीवर यावर उपाय निघाला नाही, तर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.