बेळगाव : जिल्हा प्रशासनाने महिनाभरात मराठी भाषेतील फलक आणि शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला
.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठी फलक आणि कागदपत्रांसाठी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, भाषेच्या समस्येवर सकारात्मक भूमिका घेत वरिष्ठ स्तरावर महाराष्ट्र व कर्नाटकातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्याची आणि आवश्यक ती पावले उचलण्याची ग्वाही दिली. यावेळी शांततेच्या मार्गाने काढलेल्या मोर्चा -निवेदनाचे डीसी आणि पोलिस कमिशनरनी कौतुक केले.
गेली साठ वर्षे आम्हीं न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, कर्नाटकातील बिदर भालकी -कारवार निपाणी भगात 15 टक्क्यांहून अधिक प्रमाणा असतानाही मराठी भाषिकांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. लोकशाहीने दिलेल्या सर्वच कायदे पायदळी तुडवत कर्नाटक सरकार जबरदस्तीने कन्नड सक्ती अधीकच तीव्र करत आहे. याला आमचा विरोध असून, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा कायम असेल.
–माजी आमदार मनोहर किणेकर….
युवा समिती व मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून मी वरच्या वर मराठीसाठी आवाज उठवत असल्याच्या सुडबुद्धीतून दोनवेळा मला तडीपार नोटीस देण्यात आली आहे. याविरोधात आम्हीं उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, कोणत्या आधारे तुम्हीं तडीपारचा गुन्हा केला याचे स्पष्टीकरण न्यायालयानेही कर्नाटक सरकारकडे मागितले असता कोणतेच उत्तर मिळाले नाही. लोकशाहीच्या मार्गाने भाषेसाठी न्याय मागणे म्हणजे शहराची शांतता बिघडवणे आहे का? कर्नाटक रक्षण वेदिकेचे लोक धांगड दिंगांना घालतात त्याला काय म्हणावे? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे..
–शुभम शेळके,युवा समिती अध्यक्ष .
आमचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असतानाही कर्नाटक सरकार त्याची कोणतीही तमा न बाळगता ब्रिटीशांपेक्षाही आमच्यावर अन्याय करत सुटले आहे. तरीही आम्हीं लोकशाहीच्या मार्गाने लढा देत आहोत. भाषेची मागणी करणे म्हणजे कोणता गुन्हा आहे का?
–दिगंबर पाटील, माजी आमदार खानापूर .
दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या कर्नाटक सरकारच्या अन्यायाची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी, आणि आम्हाला न्याय ध्यावा एवढीच आमची मागणी आहे. आज बेळगांव जिल्हाधिकारी महमद रोशन यांनाही आम्हीं हीच मागणी केली आहे. त्यांनीही याची दखल घेतील याची आम्हाला खात्री आहे..
–विलास बेळगावकर, माजी खानापुर म. ए. समिती अध्यक्ष..