
खानापूर: चापगाव ते हडलगा, खैरवाड डोंगरी परिसरात मागील महिन्यापासून एक बिबट्या सक्रीय असून, त्याच्या हल्ल्यांमुळे या भागातील जनावरांना धोका निर्माण झाला आहे. या बिबट्याने आतापर्यंत अनेक कुत्र्यांवर आणि शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे. नुकतेच हडलगा येथील एका माजी सैनिकाच्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला, ज्यात काही बकरी ठार झाल्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून हा बिबट्या चापगाव, आल्लेहोळ आणि हडलगा या परिसरात फिरताना दिसून आला आहे. चापगाव-हडलगा रस्त्यावरही काही दिवसांपूर्वी त्याचे दर्शन झाले होते. बिबट्याच्या भक्ष्यस्थानी कुत्री आणि बकरी आहेत; काही बकऱ्यांचे गायब होण्याचे प्रकारही घडले आहेत. विशेषत: खैरवाड डोंगरीजवळ हडलगा येथील एका शेतकऱ्याचा एक चांगला ठगर आणि एक बकरी ठार झाल्याचे समोर आले आहे, तसेच काही बकरी जखमी झालेल्या दिसून आल्या आहेत.
या धोकादायक परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वन खात्याकडे केली आहे.
