चार कोटींच्या उलाढालीकडे तिवोली येथील श्री लक्ष्मीदेवी सोसायटीची वाटचाल; वार्षिक सभा उत्साहात | ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸ್ ಕೋ-ಆಪ್. ಸೊಸೈಟಿಯ 11ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ
तिवोली : खानापूर तालुक्यातील तिवोली येथील श्री लक्ष्मीदेवी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. संस्थेची सन 2025-26 ची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी श्री लक्ष्मीदेवी मंदिर, तिवोली येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

संस्थेचे अध्यक्ष रमेश म. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सभासद व हितचिंतक उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. संस्थेचे आर्थिक व्यवहार, प्रगती आणि आगामी वर्षातील नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

संस्थेची आर्थिक वाटचाल समाधानकारक असून संस्थेकडे सध्या 719 सभासद आहेत. संस्थेचे भागभांडवल 11 लाख 86 हजार 740, खेळते भांडवल ₹2 कोटी 18 लाख 83 हजार 239, राखीव व इतर निधी ₹2 लाख 75 हजार 484, ठेवी ₹1 कोटी 69 लाख 84 हजार 466, तर कर्ज व्यवहार ₹1 कोटी 34 लाख 57 हजार 341 इतका आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल ₹3 कोटी 59 लाख 82 हजार 253 इतकी झाली असून संस्था चार कोटी रुपयांच्या उलाढालीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
सभेत संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. कृष्णा देसाई तिनई मेढा यांनी आपल्या भागात देखील एक शाखा उघडावी अशी मागणी केली. यावेळी सुभाष पाटील, मरू पाटील आणि यशवंत देसाई यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत, सभासदांच्या हिताबाबत तसेच संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत आपले विचार व्यक्त केले.
यावेळी गरजू नागरिकांसाठी संस्थेने आर्थिक कामकाजासोबत सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तसेच संस्थेच्या वतीने पहिली ते आठवी इयत्तेतील यावर्षीच्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने घेतलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
सभेचे सूत्रसंचालन यशवंत देसाई यांनी केले, तर संस्थेचा वार्षिक अहवाल वाचन संस्थेचे सचिव दीपक देसाई यांनी केले. विविध विषयांवर सभासदांनी मते व सूचना मांडल्या. सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन आवश्यक निर्णय घेण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश म. पाटील, उपाध्यक्ष पोमाणी द. नाळकर तसेच संचालक मंडळातील सहदेव शां. हेब्बाळकर, मऱ्यापा म. पाटील, सुभाष ना. पाटील, यशवंत ब. देसाई, धनंजय प. हेब्बाळकर, शशिकांत पु. लाटगांवकर, फ्रान्सीस मि. परेरा, वासुदेव शि. सुतार, उज्ज्वला य. लाटगांवकर, सौ. मॅगी प्र. पिंटो आणि सौ. रेणुका भ. मादार यांच्यासह संस्थेचे सचिव दीपक मा. देसाई व सभासद उपस्थित होते.
शेवटी यशवंत देसाई यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
