नजरे समोरील कुप्पटगिरी गावाकडे दुर्लक्ष, गावकऱ्यांनी स्वखर्चाने केली डागडुजी
खानापूर: तालुक्यातील मोठ्या जनसंखेचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे कुप्पटगिरी. पण हे गाव अजूनही अनेक विकास कामांपासून वंचित आहे. कुप्पटगिरी गावातून खानापूर शहराला जोडणारा जुना पूल गेली कित्तेक वर्षे दुर्लक्षित आहे. या पुलावर पावसामुळे मोठ भगदाड पडले आहे. अनेक वेळा विनंती करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी स्वखर्चाने खडी सिमेंट घालून या पुलाची डागडुजी केली आहे.
यंदा पावसाने संततधार कायम ठेवल्याने पुलाची अधिक वाताहत झाली होती. या पुलावरून प्रवास करणे धोकादायक बनले होते. प्रशासन लक्ष देत नसल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी सदर खड्डे स्वतःच बुजविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी ग्रामस्थांनी स्वखर्चाने भगदाड सिमेंट खडी घालून बुजविले.
त्यामुळे, या पुलावरुन आता प्रवास करणे शक्य झाले आहे. ग्रामस्थांनी श्रमदान करून प्रशासनासह लोकप्रतिनिधींनाही चपराक लगावली आहे. तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अशीच अवस्था असताना बांधकाम खाते अथवा जिल्हा पंचायत खात्याकडून अद्याप तरी कोणतीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या रस्त्यांचा विकास होणार की, नुसतीच आश्वासने ऐकावी लागणार, असा सवाल केला जात आहे.
निवेदनांकडे दुर्लक्ष दोन वर्षांपासून आम्ही अनेकवेळा ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, बांधकाम खाते व सर्व लोकप्रतिनधींना रस्ता दुरुस्तीबाबत निवेदने दिली आहेत. पण, रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. त्यामुळे, स्वतःच खड्डे बुजविण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
kuppatgiri khanapur
khanapur kuppatgiri