खानापूर : कापोली (के.जी.) येथे श्री माऊली देवी यात्रोत्सव
खानापूर तालुक्यातील कापोली (के.जी.) येथे ग्रामदेवता श्री माऊली देवी यांचा सालाबादप्रमाणे भव्य यात्रोत्सव शुक्रवार, दि. 23 जानेवारीपासून मंगळवार, दि. 27 जानेवारी 2026 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक, सामाजिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रोत्सवानिमित्त शनिवार, दि. 24 जानेवारीपासून हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, युवकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. तसेच रविवार, दि. 25 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच दिवशी प्राचार्य रमेश ग. देसाई व मित्र परिवार फाउंडेशन यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मराठा मंडळ कापोली हायस्कूल, कापोली (के.जी.) येथे होणार आहे. या शिबिरात डॉ. प्राची प्रसाद पाटील (मधुमेह तज्ज्ञ व जनरल फिजिशियन), डॉ. आदर्श कब्बूर व डॉ. गिरीश के. यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मंगळवार, दि. 27 जानेवारी रोजी यात्रोत्सवाची सांगता होणार असून, सर्व भाविकांनी या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
