खानापूरात महाराष्ट्र एकीकरण समिती युवा कार्यकर्त्यांची बैठक संपन्न; मराठी भाषा व शाळा टिकवण्यासाठी युवकांनी पुढे यावे
खानापूर : रविवार दिनांक २४ मे २०२५ रोजी खानापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक श्री शिवस्मारक येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत मराठी भाषा, संस्कृती तसेच मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी युवकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
बैठकीत समितीच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून मराठी समाजासाठी कार्य करण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला. यावेळी रावसाहेब वागळे कॉलेजचे शिक्षक शंकर गावडे तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे चिटणीस प्रतीक पाटील यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.
शंकर गावडे यांनी सीमाप्रश्न, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीचा इतिहास तसेच मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचे महत्त्व यावर सविस्तर माहिती दिली. “मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा आहेत. त्या टिकल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
युवा समितीचे चिटणीस प्रतीक पाटील यांनी सांगितले की, गेल्या अनेक दशकांपासून सीमाभागातील मराठी बांधव संघर्ष करत आहेत. मराठी भाषा संपवण्यासाठी मराठी शाळा बंद पडाव्यात, असा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे गावोगावी मराठी संस्कृती संवर्धनासाठी युवकांनी जागृत होण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच यंदाच्या वर्षापासून खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाची जबाबदारी युवा कार्यकर्त्यांनी स्वीकारून सामाजिक कार्याची सुरुवात करावी, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी युवा समितीचे पदाधिकारी साईनाथ शिरोडकर यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीस श्री. सुनील पाटील, शुभम कांबळे, बाळकृष्ण पाटील, प्रसन्न पाटील, लक्ष्मण भातकांडे, वैभव कारेकर, संदेश कोचवाडकर, प्रसाद देसाई, यतीन पाटील, मुकेश गुरव, आर्यन पाटील, लक्ष्मण शास्त्री, राम चिखलकर, यश गावडे, पृथ्वीराज गुरव, राहुल चापगावकर, आदित्य देसाई, ओंकार पाटील, सोमनाथ गोरे, राधाबा, कपिल, दत्तराज, बापू, निखिल, हर्ष, सिमानी, परशुराम मुतगेकर आदी उपस्थित होते.
