खानापूर: चार दुकानांमध्ये चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास
खानापूर वार्ता:
खानापूर शहरातील सरकारी दवाखान्यासमोर असलेल्या व्यावसायिक संकुलातील चार दुकानांमध्ये सोमवारी रात्री चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी शटर तोडून रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत.
चोरट्यांनी टेकडी बॉण्ड रायटर, सुळकर मेडिकल, महेश सायबर, आणि विकी फोटोग्राफर या दुकानांची शटर तोडून आत प्रवेश केला. टेकडी बॉण्ड रायटरमधून ८,००० रुपये, महेश सायबरमधून ५,००० रुपये, विकी फोटोग्राफरमधील ७०,००० रुपयांचा कॅमेरा, तसेच सुळकर मेडिकलमधून किरकोळ रक्कम आणि औषध सामग्री चोरली गेली.
या घटनेत चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कपडा झाकून रेकॉर्डिंग बंद केले, तसेच काही इलेक्ट्रिक साहित्य आणि सीसीटीव्ही उपकरणेही लंपास केली आहेत.
मंगळवारी सकाळी दुकानदारांनी आपली दुकाने उघडण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित दुकानदारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, खानापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
