खानापूर: 9 वर्षीय मुलीचा विद्युत तारांना स्पर्श; दुर्दैवी मृत्यू
खानापूर, 3 एप्रिल: खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे एका दुर्दैवी घटनेत 9 वर्षीय मुलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. बुधवारी (2 एप्रिल) सायंकाळी 5.45 वाजता ही दुर्घटना घडली. मनाली मारुती चोपडे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे.
घटनेचा सविस्तर आढावा
इदलहोंड आणि सिंगिनकोप या लागून असलेल्या गावांजवळ मारुती चोपडे यांचे घर आहे. त्यांच्या घराशेजारील वीटभट्टी मालकाने विटा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माती साठवली होती. या मातीच्या ढिगाऱ्यावरूनच हेस्कॉमच्या (कर्नाटक वीज वितरण कंपनी) विद्युत तारा गेल्या आहेत.
बुधवारी सायंकाळी मनाली इतर चार मुलांसह या ढिगाऱ्यावर खेळत होती. खेळताना तिचा तोल गेल्याने तिने आधारासाठी वीज तार पकडली आणि तिला तीव्र विद्युत धक्का बसला. यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खानापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वीटभट्टी मालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत?
या घटनेबाबत हेस्कॉम अधिकाऱ्यांनी सांगितले की, वीटभट्टी मालकाला मातीचा ढीग हटविण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने दुर्लक्ष केल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला.
पोलिस तपास सुरू
या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूरच्या सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला असून गुरुवारी (3 एप्रिल) सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. दरम्यान, वीटभट्टी मालक घटना घडल्यानंतर फरार झाल्याचे समजते.